इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाची तंबी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाची तंबी

’कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने त्याचा आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात.

साठ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण
एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
लोकशाहीचा उत्सव आणि मतदारांचा उत्साह

मुंबई / प्रतिनिधी: ’कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने त्याचा आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात. हे चालणार नाही’, अशी तंबी आज मुंबई उच्च न्यायालयाने इमारत दुर्घटनांच्या प्रकरणी सुनावणीवेळी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या विविध प्रशासनांना दिली. मुंबई महापालिका व अन्य प्रशासन अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाहीत, असे मालाड इमारत दुर्घटना प्रकरणी अहवालातून समोर येत आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. 

इमारत दुर्घटनांप्रकरणी आज महत्त्वाची सुनवणी झाली. मालाड इमारत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जे. पी. देवधर यांच्या न्यायालयीन आयोगाचा प्राथमिक अहवाल आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. या अहवालावर अनेक निरीक्षणे नोंदवत खंडपीठाने महत्त्वाचे असे निर्देशही दिले. ’आम्ही अहवाल पाहिला. त्याचा प्राथमिक निष्कर्ष असा, की जुनी एक मजली इमारत होती. ती एकाने विकत घेतली आणि त्याने स्वत:हून तीन मजली केली. मुंबई महापालिकेच्या किंवा अन्य कोणत्याही प्रशासनाच्या मंजुरीविना हे काम झाले. चौकशी आयुक्तांनी याप्रश्‍नी संबंधित अधिकार्‍यांवर जबाबदारीही निश्‍चित केली आहे’, असे यातून स्पष्ट होते

’या अहवालाचा मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने अभ्यास करावा आणि आमच्यासमोर उपाय मांडावे. पावसाळा सुरू असल्याने आम्हाला आणखी दुर्घटना घडून जीव जावे, असे वाटत नाही. त्यामुळे पुढील शुक्रवारी तुमचा प्रतिसाद आम्हाला मांडावा’, असे निर्देश या वेळी खंडपीठाने दिले. आठ हजारापेक्षा अधिक बांधकामे मालाडमधील त्या परिसरात आहेत आणि त्यापैकी किती अनधिकृत आहेत, हे चित्र अद्याप स्पष्ट नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले असता ’मालवणी परिसरात ही समस्या आहे. तिथे रहिवाशांनी स्वत:हूनच अनधिकृत मजले उभारले आहेत’, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायासयातच दिली. त्यावर खंडपीठाने खडेबोल सुनावले. कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात. हे चालणार नाही, असे खंडपीठाने बजावले. राज्य सरकारची प्रशासने व मुंबई महापालिका अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाही, असे अहवालातून समोर येत असल्याचेही खंडपीठाने नमूद केले.

COMMENTS