Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमाप्रश्‍नी कर्नाटकी पोलिसांची दडपशाही

महाविकास आघाडींच्या नेत्यांची धरपकड करत केला लाठीमार

नागपूर/कोल्हापूर/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सीमाप्रश्‍नी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे बेळगाव येथे मराठी भाषिकां

पर्यटकांनी फुलले पाचगणी, महाबळेश्‍वर
संतसाहित्य माणुसकीचे भरणपोषण करणारे ः ह.भ.प. बापू महाराज देवतरसे
सर्वसमावेशक अर्थसंकल्पाला तिलांजली

नागपूर/कोल्हापूर/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सीमाप्रश्‍नी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी निघालेलय महाविकास आघाडीच्या नेत्यांची पोलिसांनी धरपकड करत, त्यांच्यावर लाठीमार केला कर्नाटक पोलिसांनी माझ्यावरही लाठीमार केल्याचा आरोप माजीमंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल आणि निपाणी सीमा हद्दीतील दूधगंगा पुलावर ही घटना घडली. यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर सुमारे दीड तास तणाव पाहायला मिळाला.


कर्नाटक पोलिस आणि आंदोलकांत झालेल्या धक्काबुक्कीनंतर म्हाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे महाराष्ट्र पोलिसांच्या गाडीत जाऊन बसले. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन सोडल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील बेळगावमध्ये सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार होता. त्यासाठी सर्व पूर्तता आयोजकांकडून करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सीमा भागात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होत असल्याचे कारण देत, पोलिसांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत, याशिवाय कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन करणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. त्यातच सोमवारी दुपारी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी बेळगावच्या दिशेने कूच केली होती. त्यांना कोगनोळी टोलनाक्यावर अडवत पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारत या नेत्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये धरपकड झाल्याचे देखील पाहायला मिळाले.


हसन मुश्रीफ आणि संजय पवार यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोलनाक्यावर अडवल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे परिसरात कर्नाटक सरकारने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय खासदार आणि महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्‍नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनाही बेळगावात प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने आज महामेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चाला कर्नाटकने अचानकपणे परवानगी नाकारली. बेळगावमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी कलम 144 लागू करून जमावबंदी लागू केली. महामेळाव्यासाठी तयार केलेले व्यासपीठही पोलिसांनी काढले होते.

मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य ः उपमुख्यमंत्री फडणवीस
बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाऊ दिले पाहिजे, असे म्हणत सीमावादावर सरकार पाठिशी असल्याचे आश्‍वासन दिले. शोकप्रस्तावानंतर अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

सीमेवर 200 पोलिसांचा पहारा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 200 हून अधिक पोलिसांनी कर्नाटक राज्याची सीमा रोखून धरली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन पुन्हा पुन्हा कर्नाटक पोलिसांचेकडे तोडून कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.

सीमावासियांसाठी शासन सकारात्मक ः मुख्यमंत्री शिंदे
सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली. सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी दोन हजार कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

COMMENTS