Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुर, ज्वारी, तांदळाच्या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

अकोला ः भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथील केंद्रीय पीकवाण प्रसारण उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख

भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 22 शेळ्यासह एक व्यक्ती जखमी
कराड तालुक्यातील बेलवाडी येथे एकरी 125 टन उसाचे उत्पादन
 कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल 

अकोला ः भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथील केंद्रीय पीकवाण प्रसारण उपसमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तीन पीक वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये तुर पिकाचे पीडीकेव्ही आश्‍लेषा वाण, ज्वारी पिकाचे रब्बी हुरडा वाण ट्रॉम्बे अकोला सुरुची आणि तांदुळाचा पीडीकेव्ही साधना आदी वाणांचा समावेश आहे.


तुर पिकाचा पीडीकेव्ही आश्‍लेषा हा मध्यम कालावधीत परिपक्व होणारा (174 ते 178 दिवस), मर वांझ, फायटोप्थेरा, करपा, मॅकोफोमिना करपा व पानांवरील सर्कोसपोरा ठिपके या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम वाण असून 20 टक्के प्रथिने आणि 74 टक्के डाळीच्या उतार्‍यासह अधिक उत्पादन देणारा वाण आहे. याचे सरासरी 19 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन होते. तूर पिकाचा हा वाण राष्ट्रीय पातळीवर मध्य भारतासाठी म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगडसाठी खरीप लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. ज्वारी पिकाचा बहू प्रतिक्षित रब्बी हुरडावाण ट्रॉम्बे-अकोला सुरुची ज्याची उत्पादनक्षमता हेक्टरी 43 क्विंटल असून 91 दिवसात परिपक्व होत महत्त्वाच्या किडी व रोगांना सहनशील व मळणीसाठी सुलभ आहे. रब्बी हंगामातील हुरड्याचा वाण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित झाला आहे. ग्रामीण अर्थार्जनासाठी विकेल ते पिकेल संकल्पना अधिक दृढ करणारा हा वाण ठरणार आहे. तर तांदुळाचा पीडीकेव्ही साधना हा लांब बारीक दाण्याचा वाण आहे. 1000 दाण्याचे वजन 25.7 ग्रॅम आहे. पानांवरील करपा व खोडकिडीला साधारण सहनशील, खाण्यासाठी तसेच पोह्या करता उत्तम असणारा मध्यम कालावधीचा (118 ते 120 दिवस) अधिक उत्पादन देणारा (45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर) वाण आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरीप हंगाम लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. माजी कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यमान कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वात ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रामेश्‍वर घोराडे, कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय गावंडे आणि कृषी संशोधन केंद्र, साकोली (भंडारा) येथील वरिष्ठ भात पैदासकार डॉ. गौतम श्यामकुंवर यांच्यासह ज्वारी, कडधान्य व भात संशोधन केंद्राच्या परिश्रमातून या वाणांची निर्मिती झाली आहे.

ज्वारीसह कडधान्य व तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत असून नुकतेच राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त पीक वाण शाश्‍वत शेतीसाठी परिणामकारक ठरणार आहेत. येत्या काळात एक गाव- एक पीक वाण संकल्पना राबवित उपरोक्त पीक वाणांचे प्रात्यक्षिके गावोगावी राबविण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू

COMMENTS