’ईडी’च्या आरोपपत्रातील ‘तो’ माजी मुख्यमंत्री कोण ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’ईडी’च्या आरोपपत्रातील ‘तो’ माजी मुख्यमंत्री कोण ?

मुंबई/प्रतिनिधी :पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत अटक असतांना, आता यात अनेक दिग्गज नेत्यांचे नाव समोर यायला लागल्यामुळे खळबळ उडतांना दिस

आनंदराज आंबेडकरांची अमरावतीतून माघार
चेंबूर फेस्टिवलच्या कार्यक्रमा दरम्यान  गायक सोनू निगम यांच्या वर करण्यात आला हल्ला
राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीच नेमावा लागेल! (काॅंग्रेसच्या अस्तित्वासाठी अनिर्वाय्य!)

मुंबई/प्रतिनिधी :पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत अटक असतांना, आता यात अनेक दिग्गज नेत्यांचे नाव समोर यायला लागल्यामुळे खळबळ उडतांना दिसून येत आहे. भाजपने थेट राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाय ईडीच्या आरोपपत्रात एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने आपल्या आरोपपत्रातून दोन गोष्टी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये 2006-2007 या काळात तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. ईडीने खुलासा केला आहे की, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्‍वासू होते म्हणून त्यांना गुरु आशिष कंपनीत आणण्यात आले. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र असल्याने या प्रकल्पात तेही गुंतले होते. प्रवीण राऊत यांच्याकडे अधिकार होते की, ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करू शकता होते. त्यांना म्हाडाशी वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे काम सोपविण्यात आले होते. संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यामुळे प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या बहुतांश सरकारी अधिकार्‍यांशी विविध फायदे मिळवण्यासाठी स्वतः संपर्क साधला. नंतर एफएसआय बिल्डरला विकला. याप्रकरणात राकेश वाधवान, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचं आपसात संगनमत होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा 25 टक्के हिस्सा होता. तरीही यात प्रवीण राऊत हे फक्त एक चेहरा होते. हे सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली झाल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

शरद पवारांची चौकशी व्हावी : भातखळकर
पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आधीच तुरुंगात आहेत. त्याच पत्राचाळ प्रकरणात आता शरद पवारांचे नाव आले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत याप्रकरणातल्या सहभागाविषयी शरद पवारांचीही चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे. मराठी माणसाला बेघर करणार्‍या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात गुरुआशिष कंपनीला काम देण्यात यावं, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत संजय राऊतांनी बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातळखकरांनी आपल्या पत्रातून उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.

आरोपपत्रात पवारांचे नाव कुठेही नाही :महेश तपासे
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचे नाव कोठेही नाही. त्यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. त्यात मविआला यश मिळाले यामुळे भाजप नाहक पवारांना पत्राचाळ प्रकरणा गोवण्याचे काम करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. तपासे म्हणाले, खोटे बोल पण रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाचा भूमिका सुरवातीपासूनच आहे. कारण नसताना मोठ-मोठ्या नेत्यांचे नाव टाकायचे. त्यांच्यावर आरोप करायचे. त्यातून काहीच प्राप्त होत नाही पण त्यातून पक्ष आणि व्यक्तीची बदनामी करण्याचा हेतू भाजपचा असतो.

COMMENTS