फडणवीसांचा मुंबई महापालिका निश्चय !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

फडणवीसांचा मुंबई महापालिका निश्चय !

महाविकास आघाडी सरकार ला  अडीच वर्षात पदच्युत केल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे केंद्रीय समितीत स्थान मिळालेले नेते देवेंद्र फडणवी

भाजपमय जिल्ह्याला…नऊ आमदारांची आडकाठी
खाऊन-पिऊन व पैसे घेऊन तोतया पोलिस झाले फरार
चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक

महाविकास आघाडी सरकार ला  अडीच वर्षात पदच्युत केल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे केंद्रीय समितीत स्थान मिळालेले नेते देवेंद्र फडणवीस यानी मुंबई महापालिका जिंकणारच असा थेट आत्मविश्वास व्यक्त करून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. शिवसेनेत केवळ फुटच नव्हे तर संपूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेल्यानंतर मुंबईचा महापौर बदलणेही आम्हाला अशक्य नव्हते, अशा, शब्दात त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकपूर्वीही ताब्यात घेऊ शकलो असतो, असे अप्रत्यक्ष सुतोवाच केले. त्याचवेळी राज्याची उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी मुंबईच्या किनाऱ्यालगत आढळलेली सशस्त्र परंतु संशयित बोट आणि त्यानंतर मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडियावर आलेला धमकीचा संदेश पाहता, ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी प्रशासकीय चुणूक दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व एकाच वेळी केंद्रीय समितीतही दाखल झाले, त्याचवेळी गृहमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात सुरक्षितता राहण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणेला आणलेली सतर्कता आणि त्याचबरोबर मुंबई महापालिका शिवसेनेच्या कब्जातून भाजपच्या कब्जात निवडणुकीच्या विजयातून आणण्याचे त्यांचे संकेत  या तीनही गोष्टी एकाच वेळी नेतृत्व म्हणून त्यांच्या नेतृत्वाला मोठेपण देतात. राजकारण आणि राजकीय सत्ता या दोन्ही बाबी परस्पर पूरक आहेतच परंतु त्याचबरोबर एक राजकीय नेतृत्व म्हणून अनेक उद्दिष्ट साध्य करण्याचा चंग बांधणे, हे ध्येय पाहिजे तितके सोपे नाही; परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या राजकारणापासून सुरुवात करून आव्हानात्मक भूमिका घेण्याची आपल्या व्यक्तिमत्त्वाची जबाबदारी कायम ठेवली आहे. त्यांच्या आगामी उद्दिष्टांमध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचीच आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल घडवून मुंबईचे अध्यक्षपद आशिष शेलार सारख्या तरुण नेत्याकडे सोपवून त्यांनी मुंबईची महापालिका जिंकण्याची प्राथमिक बांधणी एक प्रकारे पूर्ण केली आहे. मुंबई महापालिका ही एका राज्याच्या अर्थसंकल्पाएवढीच आर्थिक उलाढाल असणारी महापालिका असल्यामुळे या महापालिकेतील सत्तेचे आव्हान हे भाजपा समोर कायम राहिले आहे. भाजपाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आता कसून प्रयत्न करण्याचे ठामपणे ठरवले आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका या शिवसेनेला तितक्या सोप्या राहिलेल्या नाहीत. त्यातच शिवसेनेची एक उभी फडळी पूर्णपणे बाहेर निघाल्यामुळे, खासकरून आमदार आणि खासदार हे मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यामुळे शिवसेनेची ताकद जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आहे, तशीही कमकुवत झाली आहे. परंतु, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ही बाब शिवसेनेच्या वतीने सहानुभूतीपूर्वक मतदानातून व्यक्त होते की, भाजपचा ठाम निश्चय हा मतदान पेटीतून यशस्वी होतो, या दोन्ही बाबी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार. तरीही, ज्या पद्धतीने फडणवीस यांनी मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे, ते पाहता येणाऱ्या निवडणुका उद्धव ठाकरे यांना फार सोप्या राहिलेल्या नाहीत. अर्थात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता बदलून टाकल्यानंतर मुंबई महापालिका हे भारतीय जनता पक्षापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. हे आव्हान जर देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे पेलले तर सध्या त्यांचा केंद्रीय समितीत जो प्रवेश झाला आहे, तो आणखी वरच्या स्तराच्या समितीत म्हणजे संसदीय समितीपर्यंत उंचावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

COMMENTS