भारतीय जनता पक्षाने आपल्या नेतृत्वात बदल करीत मुंबई प्रदेशाध्यक्षपद आशिष शेलार या आक्रमक आणि मुंबईची जाण असलेल्या नेत्याकडे सोपवले तर महाराष्ट्राचे प
भारतीय जनता पक्षाने आपल्या नेतृत्वात बदल करीत मुंबई प्रदेशाध्यक्षपद आशिष शेलार या आक्रमक आणि मुंबईची जाण असलेल्या नेत्याकडे सोपवले तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसी असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवून त्यांनी महाराष्ट्राच्या एकूणच मतदारांना आता आपल्या प्रभावात आणण्याचा प्रयोग केला आहे, असे प्रथम दर्शनीच म्हणायला हरकत नाही. राज्यातील कोणत्याही पक्षाकडे नेतृत्वाची धुरा ही ओबीसींकडे नाही; त्यामुळे भाजपने ओबीसी नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देऊन ज्या पद्धतीने येणाऱ्या काळात ओबीसींना आपल्या पक्षात कसे सामावून घेतले जाईल, या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी रचना आहे यात संशय नाही. कामठी मतदार संघातून सलग तीन विधानसभा जिंकणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन भारतीय जनता पक्षाने दूरदृष्टी दाखवली आहे. अर्थात, या चाणाक्ष राजकारणाला मूर्त स्वरूप देण्याचे काम सध्यातरी राज्यात देवेंद्र फडणवीस यांनीच घडवून आणले, यात शंका नाही. राज्यात जे चार प्रमुख पक्ष आहेत, त्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा यापैकी फक्त भारतीय जनता पक्षानेच ओबीसी प्रदेशाध्यक्ष देण्याची दानत ठेवली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात कोणी काहीही आरोप करो परंतु, महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला वाचविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी अधिक प्रामाणिक प्रयत्न केले गेले. एवढेच नव्हे तर, ओबीसींच्या राजकीय समावेशाची भूमिका घेताना भाजपने थेट ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देऊन ओबीसींचा सन्मान केला आहे. याउलट काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते हे मराठाधार्जिणे राजकारण करित ओबीसींच्याप्रति निव्वळ पोकळ सहानुभूती दाखवतात. ओबीसींचा केवळ नाव घेण्यापुरता वापर करणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक दलांना पुरोगामी कसं म्हणता येईल? या पक्षांची जी फरफट झाली ती केवळ ओबीसींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अथवा ओबीसींची फसवणूक केल्यानेच झाली आहे. भाजपने आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात ही बाब आली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक दलांवर आजच मानसिक दबाव निर्माण केला. ओबीसींचा केवळ वापर करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक दलांना जे सुचलं नाही, ते फडणवीस यांनी करून दाखवले. एक काळ असा होता की, ओबीसी भोळा असल्याने त्याचे मतदान भरघोस घेऊनही त्याला काहीही मिळणार नाही, याची दक्षता राजकीय पक्ष घेत होते. आता ओबीसी जागा झाला आहे; परंतु, केवळ सत्तेची मस्ती चाखणाऱ्या महाविकास आघाडीच्या घटक दलांनी ओबीसींची ताकद अजूनही ओळखली नाही. त्यांना भुजबळ, मिटकरी अशी नावे फक्त चवीला लागतात. बाकी ओबीसी समुदायाला काही दिले नाही, तरी चालते, असा मस्तीखोर समज झालेल्या या पक्षांना फडणवीस यांनी दणकून ताळ्यावर आणले. कारण कोणाच्या मनीध्यानी नसताना फडणवीस यांनी अचानक बावनकुळे यांची निवड पक्षामार्फत घडवून आणली. हा संदेश ओबीसी मध्ये इतका मजबूतपणे जातोय की, आता २०२४ मध्ये किंवा राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तरी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात या निर्णयाचा गंभीरपणे विचार केल्याशिवाय राहणार नाही. अर्थात भाजपचे महाराष्ट्रातील राजकारण सुरुवातीपासूनच जे उभे राहिले ते ओबीसींच्या भरोश्यावरच उभे राहिलेले आहे. मुंडे – डांगे आणि फरांदे हे तिघेही भाजप नेते हे प्रामुख्याने ओबीसी होते, आणि ओबीसींच्या बेसमास वरच भाजपाने फार मोठी मुसंडी महाराष्ट्रात घेतली आहे; ही बाब आता लपून राहिलेले नाही. ही बाब चाणाक्ष नेतृत्व असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच लक्षात आली असल्यामुळे त्यांनी भाजपाचे राजकारण २०२४ च्या निवडणुकीसाठी आता ओबीसीमय करून टाकले आहे, यात शंकाच नाही.
COMMENTS