नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत नेत्रदीपक यश संपादित केले. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणार्या त्या पह
नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत नेत्रदीपक यश संपादित केले. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणार्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशातील सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून देखील त्यांच्या नावाची नोंद झालीय. ओडिशातील नगरसेविका ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतचा मुर्मू यांचा प्रवास देदिप्यमान असा राहिलाय.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. येत्या 25 जुलै रोजी त्यांचे वय 64 वर्षे 1 महिना आणि 8 दिवस असेल. द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या सर्वांत तरुण राष्ट्रपती ठरणार आहे. यापूर्वी हा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे वय 64 वर्षे 2 महिने 6 दिवस होते. ते बिनविरोध अध्यक्ष झाले. त्याचवेळी केआर नारायणन यांचे नाव सर्वांत वयस्कर राष्ट्रपती बनलेल्यांमध्ये नोंदवले गेले आहे. वयाच्या 77 वर्षे 5 महिने 21 दिवसांनी ते राष्ट्रपती झाले. देशात आतापर्यंत झालेल्या 14 राष्ट्रपतींपैकी 7 दक्षिण भारतातील होते. त्याचवेळी डॉ. राजेंद्र प्रसाद असे राष्ट्रपती होते जे दोनदा राष्ट्रपती झाले आणि बिहारचे रहिवासी होते. या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या पहिल्या नेत्या आहे. त्या देशाच्या दुसर्या महिला राष्ट्रपती आहे. यापूर्वी 2007 मध्ये प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असतील. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात झाला. अत्यंत कठीण परिस्थितीत द्रौपदी मुर्मू यांनी रामादेवी महिला कॉलेजमधून डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. द्रौपदी मुर्मू यांनी सरकारी नोकरी पत्करली, त्यांनी सिंचन आणि वीज विभागात ज्युनियर असिस्टंट क्लार्क म्हणून रुजू झाल्या. द्रौपदी मुर्मू यांनी रायरंगपूरच्या श्री अरबिंदो इंटेग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये मानद शिक्षक म्हणूनही काम केलं. 1980 मध्ये द्रौपदी मुर्मू यांचा विवाह श्यामचरण मूर्मू यांच्याशी झाला.. हा प्रेमविवाह होता. द्रौपदी मुर्मू यांना दोन मुलं आणि दोन मुली अशी अपत्य होती, त्यांचे पतीही सामाजिक कामात अग्रेसर होते. 1984 साली अवघ्या तीन वर्षाची असताना मुर्मू यांच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. ऑक्टोबर 2010 मध्ये मुर्मू यांचा मुलगा लक्ष्मणचा वयाच्या 25 व्या वर्षी अचानक मृत्यू झाला. जानेवारी 2013 मध्ये मुर्मू यांचा दुसरा मुलगा बिरंची याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
ऑक्टोबर 2014 मध्ये मूर्मू यांचे पती श्याम यांचा मृत्यू झाला, तेव्हा ते 55 वर्षांचे होते. पतीच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या घराचं रुपांतर शाळेत केलं आणि आपलं आयुष्य सामाजिक कामाला वाहिलं. 1997 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला, रायरंगपूर नगर पंचायत निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या.2000 मध्ये त्यांनी रायरंगपूर विधानसभेची निवडणूक लढवली आणि ओडिशा सरकारमध्ये मंत्री बनल्या. 2007 मध्ये ओडिशा विधानसभेच्या सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांनी परिवहन, वाणिज्य, पशुपालन खात्याचा भार सांभाळला, 2009 मध्ये पुन्हा त्यांनी रायरंगपूरची जागा जिंकली. द्रौपदी मुर्मू यांनी भाजपाच्या अनुसुचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. 2013 मध्ये द्रौपदी मुर्मू यांना भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीत एसटी मोर्चाच्या सदस्य म्हणून स्थान दिलं. द्रौपदी मुर्मू सर्वाधिक काळ राज्यपालपदावर विराजमान राहण्याचाही विक्रम केला, त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी जमशेदपूरमध्ये महिला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.
COMMENTS