मुंबई : खरंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले, तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मला उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी केली होती
मुंबई : खरंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले, तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मला उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी केली होती. शिंदे गटाचा देखील हाच सूर होता. मात्र भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करत, सर्वांनाच एक आश्चर्यचकित धक्का दिला. एक रिक्षाचालक ते, मुख्यमंत्री हा शिंदे यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. प्रचंड संघर्ष करत, त्यांनी शिवसेनेमध्ये आपले स्थान पक्के केले होते. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेनंतर प्रति ठाकरे म्हणून आनंद दिघे यांच्याकडे बघितले जात होते. त्यानंतर दिघे यांच्यानंतर शिवसेनेत सर्वात शक्तीशाली नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितले जाते. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसते तर आज एकनाथ शिंदे त्याच खुर्चीत असते, अशीही चर्चा होती. खरंतर 2019 मध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र संजय राऊत आणि सुभाष देसाई यांना शिवसेनेत दुसरा नारायण राणे तयार व्हायला नको, म्हणून त्यांचे नाव मागे पडले. तसेच शरद पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांना गळ घातल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ ठाकरे यांच्या गळयात पडली. या मंत्रिमंडळात शिंदे महाराष्ट्र सरकारचे नगरविकास मंत्री आहेत. 1980 मध्ये त्यांनी शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यापूर्वी ते रिक्षा चालवून आपली उपजीविका भागवत होते. मात्र त्यावेळी ठाण्यात आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला वाहून घेतले. आपल्या कार्यकर्त्यांची कामे करण्यास त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. पक्षासाठी ते तुरुंगातही गेले आहेत. कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमा आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी तालुक्यातील आहेत. ठाणे शहरात गेल्यानंतर त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे 11 वीपर्यंत शिक्षण घेतले. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक, त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो. एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही शिवसेनेच्या तिकिटावर कल्याणमधून खासदार आहेत. ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2014 मध्येच महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये झथऊ चे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती तर 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण (महाराष्ट्र सरकार) कॅबिनेट मंत्री पद मिळाले.
COMMENTS