नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेत घडलेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्यात बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी

कोपरगाव तालुक्यात पती, पत्नीचा खुन
जामखेड बाजार समितीची निवडणूक जिंकायचीच  
विकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या ! काय सुरू आणि काय बंद राहणार

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेत घडलेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्यात बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचे चिरंजीव व नगर मनपाचे भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच या गांधी बंधूंची चुलती (काकू) संगीता अनिल गांधी यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता येत्या 1 जूनला होणार आहे. दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या विद्यमान सत्ताधार्‍यांचे मार्गदर्शक मानले जाणारे सुरेंद्र गांधी यांना सस्पेन्स घोटाळ्यात आरोपी केल्याने नगर अर्बन बँकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या येत्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नगर अर्बन बँकेच्या सस्पेन्स खात्यातून 15 धनादेश वटवले गेले असून, यातून काही खासगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहे. बेकायदेशीरपणे झालेल्या या कृत्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला पाच लाखाचा दंडही केला आहे. या पार्श्‍वभूमीवर सस्पेन्स खात्यातील या गैरव्यवहारांबद्दल चौकशीची मागणी होत होती. त्यातून न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात आधी गांधी परिवारातील कोणाचेही नाव नव्हते. मात्र, बँकेचे लेखा परीक्षण करणार्‍यांच्या सरतपासणीत गांधी परिवारातील सुरेंद्र व देवेंद्र गांधी या बंधूंचे व संगीता अनिल गांधी या त्यांच्या चुलतीचे (काकू) नाव स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्यांना आरोपी ठरवून समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या तिघांनाही समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या येत्या सुनावणीस त्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे. अहमदनगर येथील न्यायालयात केस नंबर 714/2016 मध्ये न्यायमूर्ती श्रीमती पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे समन्स बजावले आहेत.

पैसे नसताना धनादेश वटले
या प्रकरणाची माहिती अशी की, नगर अर्बन बँकेचे सन 2009-10चे वैधानिक लेखापरीक्षक मे. गिरासे, पाटील, पवार, डावरे अँड असोसिएशन यांना त्यांच्या लेखा परीक्षणादरम्यान एक गंभीर घोटाळा लक्षात आला. बँकेचे तत्कालीन चेअरमन (स्व.) दिलीप गांधी यांची मुले सुवेंद्र गांधी, देवेंद्र गांधी व भावजयी सौ. संगीता अनिल गांधी व गांधी परिवाराच्या मालकीची फर्म मे. मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या खात्यात पैसे शिल्लक नसताना मोठ्या रक्कमांचे चेक पास झाले आहेत व नगर अर्बन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील सस्पेंस खात्यातील रक्कमांचा गैरवापर करून हे चेक पास झाले होते. या गुन्ह्याबद्दल संबंधित वैधानिक लेखापरीक्षकांनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनला गु. र. नं. 40/2015 दाखल केला होता. परंतु या गुन्ह्याचे चार्जशीट दाखल होताना आश्‍चर्यजनकपणे गांधी परिवाराची नावे आरोपींच्या नावांतून वगळली गेली होती. याबाबतचा सर्व ठपका बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ठेवण्यात येवून त्यांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर कर्मचारी व अधिकार्‍यांना अटकपूर्व जामीन घ्यावा लागला होता. सन 2016 पासून या प्रकरणी न्यायालयात खटला प्रलंबित आहे.

त्यामुळे कारवाई दडपली
बँकेचे जागरूक सभासद विनोद अमोलकचंद गांधी यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांना या गुन्ह्याबद्दल तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार आयुक्तांनी अहमदनगरच्या जिल्हा उपनिबंधकांना या गंभीर गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी सु. रा. परदेशी यांनी या घोटाळ्याची सखोल तपासणी करून तत्कालीन चेअरमन यांच्यासह त्यांची मुले व भावजयी यांना दोषी ठरविण्याचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर केला होता. या अहवालावर कारवाई होण्यापूर्वीच नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेट दर्जा घेण्यात आला व सहकार आयुक्तांचे नियंत्रण संपुष्टात आल्यामुळे संभाव्य कारवाई दडपली गेली होती.

रिझर्व्ह बँकेने केला दंड
दुसर्‍या बाजूला भारतीय रिझर्व्ह बँकेने या गंभीर घोटाळ्याची दखल घेत नगर अर्बन बँकेला पाच लाखाचा दंड केला होता. तो दंड नगर अर्बन बँकेलाच भरावा लागला होता. घोटाळा करूनही गांधी परिवार मात्र नामानिराळा राहिला होता. परंतू या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी लेखा परीक्षण करणारे ऑडिटर चंद्रकांत पवार यांची सरतपासणी सरकारी वकील अ‍ॅड. कुलकर्णी यांनी घेतली. त्यांना या कामात अ‍ॅड. अच्युत पिंगळे यांनी मदत केली. यावेळी ऑडिटर पवार यांच्याकडून या सस्पेन्स खाते गैरव्यवहारात सुरेंद्र दिलीप गांधी, देवेंद्र दिलीप गांधी व संगीता अनिल गांधी यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. कोटक महिंद्रा बँकेच्या नावाने हे 15 धनादेश वितरित झाल्याचेही पुढे आले. त्यानंतर न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 408, 409, 418 व 420 सह 34 अन्वये या तिघांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी झाल्याचेही सांगण्यात येते. मात्र, न्यायालयाच्या या कारवाईने नगर अर्बन बँकेच्या राजकीय विश्‍वात भूकंप झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

COMMENTS