आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

दीनदयाळ परिवाराची फेज-2 पाणी योजना चौकशीची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरासाठीच्या फेज-2 पाणी योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील प

नव्या केंद्रीय सहकार मंत्रालयाचे नगरमधून स्वागत
पाथर्डीचे तालुका आरोग्यधिकारी सक्तीच्या रजेवर
थोरात कारखान्याकडून 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरासाठीच्या फेज-2 पाणी योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील पंडीत दीनदयाळ परिवाराचे प्रमुख व भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फेज-2 पाणी योजनेची तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.
नगरमध्ये फेज -2 पाणी योजनेच्या कामात लोकप्रतिनिधीने केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, असा विषय नमूद करून या तक्रारीत लोढा यांनी म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने नगर शहराचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 2010 साली फेज -2 योजना मंजूर करून निधी उपलब्ध करू दिला होता. महापालिकेचे तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांनी 21 जून 2010 रोजी त्यास मंजुरी देत कार्यारंभ केला. परंतु पाणी योजनेच्या कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या तापी कंपनीला 79 कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये वाढ करीत वाढीव दराने 116 कोटीला दिले. या महत्त्वपूर्ण योजनेचे चुकीच्या पद्धतीने टेंडर दिल्या गेल्याने तेथूनच या योजनेचे बारा वाजण्यास सुरवात झाली. त्यामुळे गेल्या 12 वर्षापासून नगरकरांचा पाणीप्रश्‍न जैसे थे आहे. जकात वसुलीचे काम करणार्‍या तापी कंपनीने फेज 2 योजनेची पूर्ण वाट लावली आहे. त्यामुळे भाजपचे तत्कालीन नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती, असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, फेज 2 योजनेचे 116 कोटी, पाईपलाईन टाकण्यासाठी 20 कोटी व अमृत योजनेचे 107 कोटी असा एकूण 240 कोटी एवढ्या मोठा निधीतील कामे झाल्याचे सांगितले जाते, पण नगर शहराचा पाणीप्रश्‍न आहे तसाच आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी, मनपा संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींचे जवळचे कार्यकर्ते व ठेकेदार यांनी संगनमत करीत या सर्व कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा दावाही यात करण्यात आला आहे.

जनतेची लूट सुरू
तीन वर्षात काम पूर्ण करण्याचा कालावधी होता. मात्र, गेली 12 वर्ष रखडलेल्या या योजनेच्या इस्टीमेटमध्ये लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करीत वेळोवेळी बरेच बदल केले आहेत. अत्यंत दिरंगाई झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. इस्टीमेटप्रमाणे डीआय पाईप टाकण्याऐवजी साधे एचडीपीई पाईप टाकण्यात आले आहेत. रस्त्यांची खोदाई ही नियमाप्रमाणे झालेली नाही. खोदलेले रस्ते दुरुस्त केलेले नाही. नगरकरांचा पाणीप्रश्‍न पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाला आहे. पूर्ण शहराला एक दिवस आड पाणी व तेही केवळ एक तासच मिळत आहे. पाण्याला फोर्स नसल्याने सर्व नागरिकांना पाण्याची मोटार लावूनच पाणी भरावे लागत आहे. तसेच घरापर्यंत नळ जोडणी मनपाने करणे अपेक्षित होते. मात्र, ते कामही शहराच्या लोकप्रतिनिधीच्याच नातेवाईकाला देण्यात आले आहे. त्याने मनमानी कारभार करीत एकेका जोडणीसाठी 3 ते 10 हजार रुपये नागरिकांकडून घेत जनतेची करोडो रुपयांची लूट करत आहे. जनतेची ही लूट थांबवावी, अशी मागणी या तक्रारीत केली आहे.

चौकशीत पुरावे देणार
शहराच्या लोकप्रतिनिधीने नगरकरांना विकासाची खोटी स्वप्ने दाखवत डोळ्यात धूळफेक केली आहे. केंद्र व राज्य सरकारची उघडउघड फसवणूक केली आहे. तरी फेज-2 योजनेच्या माध्यमातून झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणार्‍या संबंधितांकडून जनतेच्या पैशाच्या केलेल्या लुटीची वसुली करावी. यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत व चौकशीअंती ते सादर करू, असेही तक्रारदार वसंत लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS