नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'झुंड' ऑस्कर मध्ये दाखल व्हावा, अशी अपेक्षा भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळी व्यक्त करित असताना शेफाली
नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘झुंड’ ऑस्कर मध्ये दाखल व्हावा, अशी अपेक्षा भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळी व्यक्त करित असताना शेफाली वैद्य नावाच्या महिलेने एक भलतीच प्रतिक्रिया दिली आहे. उच्चजातीयांविरोधात एवढा राग होता, तर अमिताभ बच्चन या उच्चजातीय अभिनेत्याला नायक म्हणून का घेतले? हा त्यांचा प्रश्न तार्किक दृष्ट्या काहीसा योग्य वाटत असला, तरी त्यात विचार नसून एक सांस्कृतिक मूस दिसते. नागराज मंजुळे यांचे चित्रपट उच्चजातीयांचा द्वेष करणारे नसून ग्रामीण भागातील जीवनवास्तव मांडणारे विषय असतात. आता, या जीवनवास्तवाची मांडणी करताना त्यात जे घटनाक्रम येतात, ते जातींचे वास्तव स्वरूप प्रकट करतात. याचा अर्थ जातवास्तवयुक्त विषय म्हणून तो आपसूकच आकार घेतो. मात्र, या जातवास्तवात माणसांवर अन्याय – अत्याचार करणारे घटक हे उच्चजातीय दिसतात, त्यास मंजुळे जबाबदार नाहीत. किंबहुना, नागराज मंजुळे वरच्या जातीसमाजातही तितक्याच सहजपणे वावरतात. त्यांच्या कलाकृतींना भांडवल ओतून सफाईदारपणे पेश करण्याचं काम वरच्या जातीच्या भांडवलदारांकडूनच केले जाते, हेदेखील वास्तव आहे. ज्या – ज्या वेळी आणि ज्या – ज्या घटनाक्रमात जातवास्तव मांडले जाते किंवा मांडले जाईल, त्या-त्या वेळी ते वास्तव तटस्थपणे स्वीकारण्याचे साहस वरच्या जातींनी अंगी जोपासायला हवे. मंजुळे हे जातवास्तव न मांडता ते ज्या जातीसमाजाचा घटक आहेत, त्याचे जीवन ते मांडतात. त्यात वरच्या जाती सामाजिक दृष्ट्या दोषी आढळत असेल तर आपल्या स्वतः मध्ये सुधारणा करण्याची संधी म्हणून वरच्या जातींनी ते स्वीकारायला हवे. काल प्रदर्शित झालेला बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट तर ग्रामीण भागातील जातीकथा मांडत नसून शहरांत झोपडपट्टीत वसलेल्या मुलांचे एक संघर्षशील जीवन मांडतो. शहरी जीवनावर बेतलेल्या कथानकातही जर शहरातील जातवास्तवच पुढे येत असेल तर वरच्या जाती या क्रमिक असमानता कायम ठेवण्यातच धन्यता मानतात, असा त्याचा अर्थ होतो. यातून वरच्या जातींचा द्वेष मंजुळे व्यक्त करित नसून वरच्या जातीत मानवता निर्माण व्हावी, यासाठी ते प्रयत्न करताहेत, असा त्याचा थेट अर्थ निघतो.पण, शेफाली वैद्य यांना तशी संधी नकोय. त्यामुळेच त्या मंजुळे यांच्या चित्रपट विषयावर व्यक्त होताना, असे सुचवतात की, उच्चजातीय हे प्रतिभाशाली असून त्यांच्या प्रतिभेला खालच्या जातींनी घेऊ नये, हा त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ आहे. शेफाली वैद्य या अतिवादी किंवा एक्स्ट्रीम विचारांच्या असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यांनी चालविलेल्या “नो बिंदी, नो बिझनेस” ही मोहीम चालवून आपल्या अतिवादी विचारांची ओळख दिली. डॉट बस्टर्स ही संघटना किंवा मोहीम, ज्यांच्या कपाळावर डॉट असेल म्हणजे बिंदी असेल त्यांना बर्स्ट करणे म्हणजे ठार करणे असा त्याचा अर्थ होतो. कपाळावर बिंदी ही फक्त भारतीय स्त्रीच लावते. त्यावेळी अमेरिकेत फक्त वरच्या जातीच्याच लोकांना जाणे शक्य होते. अमेरिकेत गेलेल्या भारतीय स्त्रियाच कपाळावर बिंदी लावत. कपाळावर बिंदी लावणाऱ्यांना बर्स्ट करणे म्हणजे भारतीयांच्या विरोधात ही मोहीम होती. उच्चजातीयांच्या विरोधातील अमेरिकेत एकेकाळी चालविल्या गेलेल्या मोहीमेची प्रेरणा घेणाऱ्या शेफाली वैद्य याच एकप्रकारे उच्चजातीय भारतीयांच्या विरोधी दिसतात. परंतु, झूंड च्या निमित्ताने त्या हा आरोप मंजुळे यांच्यावर करताहेत, हा विरोधाभास आहे!
COMMENTS