नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या परेडमध्ये 'पॉप्युलर चॉईस' प्रकारात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पट
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या परेडमध्ये ‘पॉप्युलर चॉईस’ प्रकारात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर लष्करी तुकड्यांमध्ये सीआयएसएफला सीएपीएफमधील सर्वोत्तम परेड करणारी तुकडी म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
यावर्षी प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेवर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे दर्शन संपूर्ण भारतवासीयांना घडून आले. प्रजासत्ताक दिन परेडमध्ये भारतीय नौदलाची सर्वोत्तम मार्चिंग तुकडी म्हणून निवड झाली असून, लोकप्रिय निवड श्रेणीत भारतीय वायुसेनेचा विजय झाला आहे. शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला मंत्रालयांच्या श्रेणीतील संयुक्त विजेते म्हणून, घोषित करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आले होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली. तसेच महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत.
चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या तसेच शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड विशेष आकर्षक दिसत होते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी 2015 नंतर दोन वेळा राजपथावरील संचलनात बाजी मारली आहे. दोनदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी 2015 मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर 2018 साली ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी 1980, 1983, त्यानंतर 1993 ते 1995 अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी बाजी मारली होती.
COMMENTS