सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील ८९९ पदाची सरळ सेवेने होणारी भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाऐवजी `एमपीएससी'कडूनच राबवावी, अशी मागणी भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
ठाणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील ८९९ पदाची सरळ सेवेने होणारी भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाऐवजी `एमपीएससी’कडूनच राबवावी, अशी मागणी भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
एमपीएससी’ला डावलून स्वतंत्र निवड मंडळाद्वारे भरतीचा निर्णय चुकीचा आहे, असे आमदार डावखरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. एमपीएससी ही राज्यातील वर्ग १ व वर्ग २ या पदांची भरती प्रक्रिया राबविणारी घटनात्मक संस्था आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग १ च्या पदाची भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाकडून करणे हे असंवैधानिक आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग १ या पदाचीही भरती होणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. त्यामुळेच या दोन्ही पदांची भरती `एमपीएससी’कडून करावी, असे आमदार डावखरे यांनी पत्रात नमूद केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ पदभरती आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीचा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा घोळ लक्षात घेता वर्ग १ या महत्वाच्या पदांसाठी पुन्हा स्वतंत्र निवड मंडळ नेमून पुन्हा घोळ घालायचा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
COMMENTS