अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्प राबवण्याआधी नगरच्या रस्त्यांवर मनपाच्या पथदिव्यांचा जेवढा उजेड होता, तेवढाच उजेड स्मार्ट ए
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्प राबवण्याआधी नगरच्या रस्त्यांवर मनपाच्या पथदिव्यांचा जेवढा उजेड होता, तेवढाच उजेड स्मार्ट एलईडी पथदिव्यांचा आम्हाला हवा आहे…अशा शब्दात स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपाच्या प्रशासनाला मंगळवारी ठणकावले. या पार्श्वभूमीवर उपायुक्त यशवंत डांगे यांनी नवा पथदिवे प्रकल्प राबवणार्या ठेकेदाराची बाजू घेत, 25 हजार पथदिव्यांपैकी 9 हजारावर पथदिवे लावून झाल्याने रस्ते प्रकाशमान झाल्याचा दावा केला, पण त्यालाही आक्षेप घेताना, लावलेल्या नव्या 9 हजार पथदिव्यांपैकी किमान 20 टक्के पथदिवे आताच बंद पडल्याचे सांगून नगरसेवकांनी उपायुक्त डांगेंच्या दाव्यातील हवाच काढून घेतली. महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा मंगळवारी झाली. तब्बल 47 विषय सभा अजेंड्यावर होते. त्यामुळे काहीअंशी ऑफलाईन सभाही स्थायीच्या सभागृहात झाली. सभापती अविनाश घुले अध्यक्षस्थानी होते. सदस्य मुदस्सर शेख, प्रकाश भागानगरे, समद खान, डॉ. सागर बोरुडे, रवींद्र बारस्कर, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, मनोज कोतकर यांनी चर्चेत भाग घेतला. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डांगे, शहर अभियंता सुरेश इथापे, नगरसचिव एस. बी. तडवी यावेळी उपस्थित होते. नगर शहरात सध्या स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्प गाजत आहे. या नव्या पथदिव्यांचा पुरेसा उजेड रस्त्यांवर पडत नसल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. त्यामुळे मनपाच्या प्रत्येक सभेत या विषयावरील चर्चा रंगते. मंगळवारी झालेली स्थायी समितीची सभाही याला अपवाद राहिली नाही. श्याम नळकांडे यांनी या विषयावरील चर्चेला तोंड फोडले. विद्युत विभागाचे अभियंता जयेश कोके यांनी त्यांना उत्तरे दिली, पण काही प्रश्नांची उत्तरे वा माहिती त्यांना नसल्याने त्यांच्या मदतीला उपायुक्त डांगे धावून आले. त्यांनी पथदिवे ठेकेदाराची बाजू घेत, नव्या पथदिव्यांमुळे नागरिक समाधानी असल्याचा दावा केला. नगरसेवकांनी मध्यरात्री साडेबारा-एकच्या दरम्यान शहरातील रस्त्यांवर चक्कर मारली तर रस्ते प्रकाशमान झाल्याचे व चित्र बदलले असल्याचे दिसेल, नागरिक त्यावर समाधानीही आहेत, असे सांगून ते म्हणाले, शहरात 25 हजार पथदिवे बसवण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 9 हजारावर पथदिवे बसवून झाले आहेत व ठेकेदाराला दिलेल्या 5 फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीत सर्व पथदिवे लावून होतील, असा दावाही त्यांनी केला.
नगरसेवक झाले आक्रमक
उपायुक्त डांगे यांनी पथदिवे प्रकल्प कामाचे एकाअर्थाने समर्थन केल्याने नगरसेवक आक्रमक झाले. खुद्द सभापती घुले यांच्यासह भागानगरे, कोतकर, नळकांडे यांनी तक्रारींचा पाढाच सुरू केला. नव्याने लावलेल्या 9 हजार पथदिव्यांपैकी तब्बल 20 टक्के बंद पडले आहेत, ठेकेदाराची एकच गाडी व दोन-तीन माणसेच हे दिवे लावण्याचे काम करतात व ते सुरू असताना संबंधित परिसरातील सर्वच वीजपुरवठा बंद केला जातो, त्यामुळे महावितरणकडून व परिसरात राहणारांकडून नगरसेवकांनाच लाईट का गेली म्हणून विचारणा होते, पथदिव्यांबाबत तक्रार करण्यासाठी टोल-फ्री नंबर देणार होते पण तोही दिलेला नाही, ठेकेदाराने कुष्ठधाम रोडवर 60 ते 65 वॅटच्या दिव्यांच्या उजेडाचे प्रात्यक्षिक (डेमो) दिला आहे पण प्रत्यक्षात 16 व 24 वॅटचे दिवे लावले जात आहेत, त्यामुळे आम्हाला किती वॅटचे दिवे आहेत, याच्याशी मतलब नाही, पण आम्हाला प्रकाशाला प्रकाश व उजेडाला उजेड द्या, डेमोसाठी वेगळ्या वॅटचे व प्रत्यक्षात वेगळ्या वॅटचे दिवे लावायचे प्रशासन-पदाधिकार्यांशी ठरले आहे काय, हे पथदिवे बसवले जात असताना वायर संपली वा पाईप संपला तर तेथील नगरसेवकाला स्वखर्चातून ते आणावे लागतात, पथदिव्यांचे हे काम दुपारी 1नंतर सुरू होते व ठेकेदाराकडे पुरेसे साहित्यही नसते, नाशिकहून त्याचे साहित्य नियमितपणे येत नाही, नवे लावलेले दिवे सुरू आहे की बंद आहेत हे पाहण्यास मनपाची कोणतीही यंत्रणा नाही, मनपाचे वायरमन व गाड्याही ठेकेदाराकडून वापरल्या जातात, लसीकरणाच्या गोंधळासारखा हा पथदिव्यांचा गोंध सुरू आहे व मनपाची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे, असा भडीमार नगरसेवकांकडून सुरू झाल्यावर उपायुक्त डांगेंचा सूरही नरमाईचा झाला व ठेकेदाराला साहित्य वाढवण्याचे सांगितले जाईल, मनपाचे वायरमन त्याच्या मदतीला दिले जातील, मनपाद्वारे पुरेशी सर्व्हिस वायर दिली जाईल व मुदतीत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दोन दिवसात एक वॉर्ड असे नियोजन करून व त्यासाठी मनपा व ठेकेदाराची सर्व यंत्रणा लावून त्या वॉर्डातील सर्व पथदिवे बसवले जावेत, त्या काळात त्या परिसराचा वीजपुरवठा गरजेनुसार बंद करावा, परिसरातील नागरिकांना या कामाच्या तारखा कळवाव्यात व त्यांचे सहकार्य घ्यावे, असेही नगरसेवकांनी सुचवले. त्यावरही विचार करण्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.
त्यांचे होणार विद्युत ऑडीट
जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपा विद्युत विभागाद्वारे मनपाचे बाळासाहेब देशपांडे प्रसुतीगृह, जुने महापालिका कार्यालयात व औरंगाबाद रस्त्यावरील नवे मनपा कार्यालय या तीन इमारतींचे येत्या महिनाभरात विद्युत ऑडीट केले जाणार असल्याचे प्रशासनाद्वारे सभेत सांगण्यात आले.
17 निकाल गेले विरोधात
मनपाद्वारे जिल्हा न्यायालयात 427 खटले प्रलंबित आहेत. तसेच 29 खटल्यांचा निकाल मनपाच्या बाजूने लागला असून 17 खटल्यांमध्ये मनपाच्या विरोधात निकाल लागला आहे. या प्रकरणांबाबत उच्च न्यायालयात अपिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात 102 प्रकरणे प्रलंबित आहेत, असेही या सभेत सांगण्यात आले.
COMMENTS