महाबळेश्वर / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाबळेश्वर येथील पर्यटनस्थळावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत. या मागणीसाठी लवकरच महाबळेश्
महाबळेश्वर / प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाबळेश्वर येथील पर्यटनस्थळावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत. या मागणीसाठी लवकरच महाबळेश्वर येथील शिष्टमंडळ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांना भेटून चर्चा करणार आहे. त्यातून मार्ग न निघाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा महाबळेश्वर येथील व्यावसायिकांनी दिला आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पर्यटनस्थळे बंद करण्याचे आदेश दिले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी येथील हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.
प्रेक्षणीय स्थळे बंद केली, तर महाबळेश्वरमध्ये पर्यटक येणार नाहीत. त्यामुळे छोट्या-मोठ्या स्थानिक व्यापारी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. महाबळेश्वरमधील प्रेक्षणीय स्थळे ठराविक निर्बंध लावून सुरू ठेवावीत, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी सांगितले. पर्यटकांच्या उपस्थितीवर महाबळेश्वर तालुक्यातील अर्थकारण व जीवनमान अवलंबून आहे. मात्र, प्रेक्षणीय स्थळे बंद केली तर महाबळेश्वरमधील हॉटेल, टॅक्सी व घोडे व्यावसायिक, गाईड, कॅनव्हर्सर, छोटे-मोठे व्यापारी आर्थिक संकटात सापडतील. स्थानिक प्रशासनाने गर्दी होणार नाही, अशा पध्दतीने योग्य प्रकारे नियोजन केल्यास प्रेक्षणीय स्थळे सुरू ठेवता येतील. ठराविक निर्बंधांसह पर्यटनस्थळ सुरू ठेवल्यास स्थानिक व्यापारी, व्यावसायिक प्रशासनास सहकार्य करतील, अशी हमी बावळेकर यांनी दिली.
लशीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येतो. मात्र, पुन्हा आता 48 तास आधी कोरोना चाचणी निगेटिव्हचा अहवाल सोबत ठेवण्याचा नवीन नियम लावण्यात आला आहे. हा अन्यायकारक व जाचक असल्याचे हॉटेल संघटनेचे सूर्यकांत जाधव यांनी सांगितले. महाबळेश्वर तालुक्यात प्रवेश करताना दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखवून प्रवेश देण्यात यावा. स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात, असे हॉटेल संघटनेच्या पदाधिकार्यांनी नमूद केले. या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटून निवेदन देण्याचे ठरले. यावेळी हॉटेल संघटनेचे शंकर जांभळे, आशिष नायडू, ब्रिजभूषण सिंग, धीरेन नागपाल, रोहन कोमटी, नॅलिनो डिक्रूज आदी उपस्थित होते.
COMMENTS