यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठे याने फरार असतानाच्या काळात त्याला मदत करणारांची नावे पोलिसांना सांगितली असून, त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी समन्स पाठवून चौकशीला बोलावले आहे.
अहमदनगर/प्रतिनिधीः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठे याने फरार असतानाच्या काळात त्याला मदत करणारांची नावे पोलिसांना सांगितली असून, त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी समन्स पाठवून चौकशीला बोलावले आहे. या पाच जणांमध्ये कोण आहे व पोलिस आता त्यांच्यावर काय कारवाई करणार, याची उत्सुकता नगरमध्ये आहे. दरम्यान, बोठेच्या सांगण्यानुसार आणखीही काही जणांनी त्याला मदत केली असल्याने पोलिसांनी त्यांनाही चौकशीच्या रडारवर घेण्याचे नियोजन सुरू केले आहे.
जरे यांच्या हत्येनंतर तब्बल 102 दिवसांनी हैदराबादला बोठे पकडला गेला. पकडल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तो काहीच बोलत नव्हता व आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत होता; पण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमोर त्याला हजर केल्यानंतर त्यांनी समज दिल्यावर बोठेने काही माहिती दिली. जरे यांच्या हत्येेनंतर ते पोलिसांनी त्याला पकडेपर्यंत तो कोठे होता, त्याला कोणाची व कशाची मदत झाली, याची माहिती पोलिसांनी त्याच्याकडून मिळवली आहे. जरे हत्याकांड प्रकरण, कोतवाली पोलिसात दाखल विनयभंगाचा गुन्हा व तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल ़ख़ंडणी प्रकरण, या तिन्ही गुन्ह्यात त्याला आता न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने तो पारनेरच्या कारागृहात आहे. आता इकडे पोलिस त्याने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्याच्या मागे लागले आहेत. वैद्यकीय व उद्योग व्यवसायातील काही जणांनी बोठेला फरार असतानाच्या काळात मदत केली आहे. ती मदत आर्थिक होती की अन्य काही; याची तपासणी पोलिसांद्वारे होणार आहे. पोलिसांनी यासंदर्भात पाच जणांना चौकशीला बोलावले आहे व ही चौकशी सोमवारपासून (5 एप्रिल) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात बोलावलेल्या या मंडळींनंतर पुढच्या टप्प्यात आणखी काहींना अशा चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. या चौकशीत बोठेने त्यांच्याविषयी दिलेल्या माहितीत तथ्य आहे, की नाही, हे तपासले जाणार आहे. यातून बोठेने चुकीची माहिती दिली काय वा कोणाचे मुद्दामहून नाव घेतले आहे काय, याचीही तपासणी होणार आहे. तसेच फरार असतानाच्या काळात बोठेला मदत केल्याचे या चौकशीत निष्पन्न झाले, तर त्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई पोलिसांकडून होणार आहे.
मदत करणारे उद्योगी कोण?
आता पहिल्या टप्प्यातील ते पाच जण कोण व पोलिस त्यांच्याकडे काय चौकशी करतात तसेच त्यांच्यावर काय कारवाई होते, बोठेने कोणाची नावे घेतली व पोलिस कोणाला चौकशीला बोलावणार आहेत, याची उत्सुकता लागली आहे
COMMENTS