शासनाचे पैसे रखडले…गावकर्‍यांनी दिले उसने…; हिवरे बाजारने लावली अखेर विकास कामे मार्गी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाचे पैसे रखडले…गावकर्‍यांनी दिले उसने…; हिवरे बाजारने लावली अखेर विकास कामे मार्गी

अहमदनगर/प्रतिनिधी : कोविडमुळे शासनाच्या विकास योजनांच्या कामांची बिले रखडल्याने व भविष्यातील भाववाढीमुळे विकास कामे ठप्प होण्याच्या भीतीने अखेर गावात

आ. तनपुरे यांच्या प्रयत्नातून 21 नवीन रोहित्रे बसविणार
शिर्डीत साई मंदीरावर परंपरेनुसार उभारली गुढी
रेमडीसीवर काळा बाजार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा- अँड नितीन पोळ

अहमदनगर/प्रतिनिधी : कोविडमुळे शासनाच्या विकास योजनांच्या कामांची बिले रखडल्याने व भविष्यातील भाववाढीमुळे विकास कामे ठप्प होण्याच्या भीतीने अखेर गावातील शेतकरी, शिक्षक व माजी सैनिक गावाच्या मदतीला धावून आले. त्यांनी तब्बल 40 लाख रुपये ग्रामपंचायतीला उसने दिले व त्या पैशांतून महागाईचा फटका न बसता गावातील विकास कामे पूर्ण झाली…नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारची ही कथा. अर्थात वर्षाखेरीस गावाने मांडलेला लेखाजोखा या अनोख्या उसनवारीची माहिती स्पष्ट करून गेला.
आदर्श गाव हिवरे बाजार येथे ग्रामसभेने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. 1 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता हिवरे बाजार येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदाचे 21 वे वर्ष आहे. कोविडच्या नियमांचे पालन करून ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत गतवर्षीच्या कामाचा आढावा व नवीन वर्षाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच विमलताई ठाणगे यांनी भूषवले. या ग्रामसभेस प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर, आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, महावितरणचे कनिष्ठ अभियंता साखरवडे तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामसेवक भास्कर सिनारे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध खात्यांचा लेखाजोखा सादर केला. त्यात दि.1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या वर्षभरातील ग्रामपंचायतीच्या विविध खात्यांच्या जमा-खर्चाचे वाचन करण्यात आले. 15 वा वित्त आयोग निधीतून वर्षभरात केलेली कामे व प्राप्त अनुदान यांचे वाचन केले तसेच सन 2022-23 चे ग्रामपंचायत अंदाजपत्रक सादर करण्यात आले व नवीन वर्षातील प्रस्तावित विकास कामांचा आराखडा सादर करण्यात आला. हिवरे बाजार येथील आध्यात्मिक खर्च ग्रामपंचायत सदस्य रोहिदास पादीर यांच्यासह एस.टी.पादीर व सहदेव पवार यांनी मांडला.

पवारांनीच केली उसनवारी स्पष्ट
या ग्रामसभेत प्रामुख्याने गेल्या वर्षभरात विविध विभागामार्फत पूर्ण झालेल्या व प्रगतीत असलेल्या विकासकामांचा जमा-खर्च सादर करण्यात आला. यासाठी झालेल्या उसनवारीची माहिती खुद्द पद्मश्री पवार यांनीच दिली. ते म्हणाले, कोविडमुळे गावातील विकास कामांची बिले शासनाकडून वेळेवर प्राप्त न झाल्यामुळे गावातील शेतकरी, शिक्षक, माजी सैनिक यांच्याकडून विकासकामासाठी जवळपास रक्कम 40 लाख रुपये उसनवारी म्हणून रकमा घेऊन कामे पूर्ण करण्यात आली आणि नंतर शासनाकडून संबंधित कामाचे अनुदान प्राप्त झाल्यावर त्यांची उसनवारी रक्कम देण्यात आली. ही रक्कम त्यांनी बिगरव्याजी गावातील विकासकामासाठी दिली. अशा प्रकारचे ग्रामस्थांचे सहकार्य अभिमानास्पद आहे. शिवाय निधीअभावी कामे वेळेत झाली नसती तर एकूणच मटेरीअल खरेदीच्या दरात 25% वाढ झाली असून त्याचा कामाच्या गुणवत्तेवर नक्कीच परिणाम झाला असता. शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध झाला नसताना ग्रामस्थांनी उसनवारी रक्कम दिली नसती तर ही कामे हिवरे बाजार ग्रामस्थ पूर्ण करू शकले नसते, असेही पवार यांनी सांगितले.

आज आरोग्य शिबीर
पद्मश्री पवार यांनी हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि नवनिर्वाचित सोसायटी सदस्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्त्कार करण्यात आला. महिलांच्या आरोग्यासाठी संपूर्ण महिलांचे हिमोग्लोबिन, शुगर व आवश्यक त्या शारीरिक चाचण्या करण्यासाठी सोमवारी (दिनांक 3 जानेवारी) सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हिवरे बाजार येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, आरोग्यदायी स्वयंपाकघर संकल्पना 100% कुटुंबात राबविण्यासाठी 16 जानेवारी रोजी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यापासून राज्यातील, परराज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी सत्कार समारंभाच्या रूपाने, फोनद्वारे, सोशल मिडीयाच्या माध्यमातून जो आनंद व्यक्त केला, त्यांच्या आभाराचा ठराव करण्यात आला.

यावेळी 2021-22 चा पाण्याचा ताळेबंद व आगामी पीक पद्धतीवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.सन 2021 मधील पर्जन्यमान 525 मि.मि.आहे.पावसामुळे एकूण उपलब्ध झालेले पाणी आणि पिकासाठी, पिण्यासाठी व इतर आवश्यक बाबीसाठी आवश्यक असलेले पाणी आणि भविष्यकाळात राखून ठेवावयाचे पाणी यावर पद्मश्री पवार यांनी सविस्तर माहिती दिली. गोखले इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेमार्फत हिवरे बाजार येथील कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले त्यावर चर्चा करण्यात आली. हिवरे बाजार येथील वाहून चाललेली माती आणि कार्बन स्थिरीकरणबाबतीत कृषी सहायक राहुल गांगुर्डे व चंद्रकांत गोरे यांनी मांडणी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील संचालक नानगुडे व पीएच.डी.झालेले इतर 6 विद्यार्थी यांनी यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

माहेरवाशिणींचा करणार सत्कार
कोविड्ची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर हिवरे बाजार येथील प्रवेशद्वार इमारतीचा उदघाटन समारंभ व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम केला जाणार असून, यात मागील 30 वर्षात हिवरे बाजार येथील विविध विकास कामांसाठी योगदान देणारे विविध शासकीय खात्याचे अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, प्रेस फोटोग्राफर आदींचा हिवरे बाजार ग्रामस्थांच्यावतीने सहकुटुंब सत्कार करण्याचे ठरले तसेच हिवरे बाजार येथील लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींचा देखील सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

COMMENTS