आम्हांला रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही

Homeमहाराष्ट्रसातारा

आम्हांला रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही

कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधात सलून व्यवसाय बंद निर्णयामुळे पुन्हा एकदा नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ घातली आहे.

पोहरादेवी संस्थांनसाठी 593 कोटींचा निधी
जवळा ग्राम सचिवालयासाठी 25 लाखाचा निधी मंजूर
साईमंदिरात फुल-हार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील ः डॉ. सुजय विखे

लोणंद येथे नाभिक समाजाची आक्रमक भूमिका

लोणंद / वार्ताहर : कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधात सलून व्यवसाय बंद निर्णयामुळे पुन्हा एकदा नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ घातली आहे. आमचे सलुन व्यवसाय आम्ही बंद ठेवले तर आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल लोणंद, ता. खंडाळा येथील नाभिक समाजाने उपस्थित केला आहे.

शासनाने सलून व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. नाहीतर नाभिक समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा नाभिम समाज बांधवांनी आयोजित केलेल्या बैठकीतून दिलेला आहे.यावेळी नाभिक समाजाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव मर्दाने, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळुंखे, तालुका उपाध्यक्ष गणेश देवकर, लोणंद अध्यक्ष राजू गोरे, कार्याध्यक्ष गणेश पवार, किशोर पवार, मिथून मर्दाने, माऊली देवकर, नाना माने, सचिन देवकर, अमित राऊत, रोहीत काशीद, संतोष राऊत, दत्ता देवकर, सचीन शिंदे आदी समाज बांधव उपस्थित होते.तसेच यावेळी साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनीही भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

बैठकीत नाभिक समाजाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव मर्दाने यांनी असे म्हटलेले आहे की, गेल्या वर्षी 23 मार्च 2020 या दिवशी राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन घोषित केले. कमीत-कमी साडेतीन ते चार महिने राहिल्याने आमच्या नाभिक समाजाची अवस्था बिकट झाली की आमचा असणारा व्यवसाय 70 टक्के बुडाल्यात जमा झाला. आमच्याकडे गिर्‍हाईक येत नाही. आज परत शासनाने 25 दिवसाचे लॉकडाऊन केले आहे. हा व्यवसाय 25 दिवस बंद राहिला तर आमच्या लोकांना रस्त्यावर येऊन भीक मागण्या शिवाय पर्याय नाही. शासनाने यावर विचार करावा. आमच्याकडून प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊ. हा सलुन व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. नाही तर आम्हांला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आमचा सलुन व्यवसाय बंद ठेवणार नाही. तुम्हांला आमच्यावर काय केसेस करायच्या आहेत काय निर्णय घ्यायचा आहे. तो तुम्ही घ्या कारण आमचा उदरनिर्वाह हा फक्त व्यवसायावर चालू आहे. जर व्यवसाय बंद पडला तर आम्ही खायचे काय हा प्रश्‍न आमच्या पुढे उभा आहे, असे ही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी कार्याध्यक्ष गणेश पवार म्हणाले की, आम्हांला दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. तुमच्या निधीची आम्हांला आवश्यकता नाही. तुम्हाला आम्ही निधी मागत नाही. बाकीच्या जो निर्णय लादलेला आहे. शनिवार-रविवार बंद तो निर्णय आमच्यावर ही लागू करावा. बाकीच्यांबरोबर आम्हाला पण भरडले जाऊ नये. पाठीमागच्या लॉकडाऊनमध्ये असा कुठला विषय घडला नाही की सलून व्यवसायिकामुळे किंवा सलून व्यवसायिकास कोरोनाची लागण झाली आहे. जर शासनाने याच्यावर निर्बंध लादला तर कुटुंबाने कसा उदरनिर्वाह करायचा? कुटूंबप्रमुख आणि समाजाला आत्मदहन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

COMMENTS