अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे होणार मूल्यमापन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे होणार मूल्यमापन

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोना सावट दूर होऊ लागल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुणवत्ता व पटसंख्या वाढी

मनपा जागा बळकावण्यासाठी सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त
साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद संपन्न
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन : अजित जगताप

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोना सावट दूर होऊ लागल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी झेडपी अधिकार्‍यांची एका दिवसाची शाळाभेट उपक्रम नगर जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. यात 100 गुणांनुसार शाळा तपासणी होणार आहे. यात मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह शाळेतील सुविधा, स्वच्छतागृहांची स्वच्छता, क्रीडा व विद्युत सुविधा, आहाराचा दर्जा अशा अनेकविध मुद्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे, शाळांच्या पायाभूत सुविधा वाढवणे, सुविधांबाबतच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम जिल्हा परिषदेकडून राबविला जात आहे. यात जिल्हा परिषद पातळीवर सर्व विभाग प्रमुख, तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी आणि त्यांच्या विभागाचे सर्व प्रमुख महिन्यातून एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी याबाबतचे आदेश नुकतेच खातेप्रमुखांना काढले आहेत. या भेटीदरम्यान संबंधित अधिकारी त्या शाळांतील सुविधांबाबत 100 गुणांची मूल्यमापन सूची तयार करतील. त्यात मुला-मुलींंसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा व हँडवॉश स्टेशन, संरक्षक भिंत, क्रीडांगण व क्रीडा साहित्य, विद्युत सुविधा या भौतिक सुविधांसाठी 20 गुण तर, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र, संगणक व इंटरनेट सुविधा, भाषा, गणित, इंग्रजी पेटी, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय या सुविधांसाठी 20 गुण आहेत. याशिवाय शालेय पोषण आहारांतर्गत आहार वाटपाचे रेकॉर्ड, स्वयंपाक घराची स्वच्छता, आहाराचा दर्जा यासाठी 20 गुण आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीसाठी 20 गुण, शाळा व्यवस्थापन समितीचे गठण व बैठकांसाठी 5 गुण, सीएसआर-लोकसहभाग यातून पटसंख्या वाढवणे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी यासाठी 15 गुण अशा एकूण 100 गुणांचे मूल्यमापन यात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच शाळांना, शिक्षकांना काही सोयीसुविधांची गरज आहे का, हे पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व पंचायत समितीचे खातेप्रमुख यांनी महिन्यांतील तिसर्‍या गुरुवारी शाळांना भेटी द्याव्यात. यात अधिकार्‍यांनी ज्या शाळेला भेट देणार, त्या शाळेतील शिक्षक उपस्थिती, विद्यार्थी उपस्थिती, शाळानुसार निकष पूर्तता, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शैक्षणिक गुणवत्ता, शासकीय परीक्षांची तयारी, शाळा स्तरावरील समित्या, शासकीय योजनांचा लाभ आदी बाबींची तपासणी करून आढळलेल्या त्रुटी व उल्लेखनीय बाबींबाबत अभिप्राय द्यावेत. याशिवाय शाळेतील भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इतर सुविधा, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची शालेय प्रगती, शाळा व्यवस्थापन समिती गठण व बैठका, पटसंख्या, बायोमेट्रिक प्रणाली या आधारे मूल्यांकन करावे, असे आदेशात म्हटले आहे. हा उपक्रम राबवण्यामागे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढण्यासह शाळांचे प्रभावी सनियंत्रण, शिक्षक व विद्यार्थी यांना सुयोग्य मार्गदर्शन, शाळांच्या पायाभूत सुविधांबाबतच्या समस्यांचे निराकरण, समाज, पालक यांचा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवणे असे अनेक उद्देश आहेत. मुख्य कार्यकारी क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.

COMMENTS