कोपरगाव/प्रतिनिधी : ती येते आणिक जाते…येताना कधी कळ्या आणिते, अन जाताना ़फुले मागते…असे एक मराठी गाणे प्रसिद्ध आहे. याच गाण्यासारखी स्थिती सध्या कोपर
कोपरगाव/प्रतिनिधी : ती येते आणिक जाते…येताना कधी कळ्या आणिते, अन जाताना ़फुले मागते…असे एक मराठी गाणे प्रसिद्ध आहे. याच गाण्यासारखी स्थिती सध्या कोपरगावच्या गोदावरी नदी काठ परिसरातील रहिवाशांची झाली आहे. पण ही त्यांच्याकडे येणारी बिनधास्त येते, कुणाला घाबरतही नाही, इकडून तिकडे हिंडते-फिरते आणि लळा लावून निघून जाते…मोराच्या लांडोरीची ही कथा आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सरच्या चक्रधरस्वामी महानुभाव आश्रम परिसरातील लांडोर या आश्रमात येणार्या भाविकांचा व परिसरात राहणार्या रहिवाशांचा चर्चेचा विषय ठरली आहे. छोटया बच्चे कंपनीची ती दोस्त बनली आहे. सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा कुठल्याही वेळेत ती इकडून तिकडे येते काय, अन अंगणातील दाणे टिपते काय, प्रत्येकजण तिच्याकडे कुतूहलाने पाहतो अन तिच्याकडे बघून सर्वजण स्वतःच्या जीवनातील व्यथा-वेदना विसरतात व त्यांच्या चेहर्याावरील ताण-तणावही दूर करतात.
या लांडोरीने संवत्सर गोदावरी नदी काठ परिसरातील रहिवाशांची प्रत्येक घरे टिपली आहेत. कोरोना लॉकडाउन काळात वर्षभरापासून ती या परिसरात वास्तव्यास आहे. ती आता माणसांना, प्राण्यांना न घाबरता अंगणात येते, इकडे तिकडे पाहते, बिनधास्त बागडते, कुणी खोड काढायचा प्रयत्न केला तर चटदिशी उंच भरारी घेते, रहिवाशांंच्या घरात जाते, प्रत्येक घर न घर फिरते…मस्तपैकी तासंतास घरात थांबते.
फोटोला देते पोझ…
या परिसरात इकडे तिकडे मुक्तपणे बागडत असताना या दरम्यान कुणी भ्रमणध्वनीद्वारे फोटो काढायला आले तर न घाबरता फोटोही काढू देते, मस्त पोझही देते. ही लांडोर आता माणसाळली आहे. लहान मुले तिच्याभोवती गलका करतात, मोर मोर म्हणून आवाज देतात, वेळप्रसंगी तिला गराडा घालतात. मुलांच्या प्रत्येक हालचालींनाही ती दाद देते. महंत राजधर बाबा बागेतही तिचा मुक्त संचार असतो. मुले कुठ कुठले खेळ खेळतात, याचेही ती बारकाईने निरीक्षण करते, लहान मुले-मुली प्रेमाने तिला खाऊही भरवतात. त्यामुळे सध्या ही लांडोर परिसरातील अबालवृद्धांना लळा लावून गेली आहे व चर्चेचा विषय ठरली आहे.
COMMENTS