रेल्वे हमाल-माथाडींच्या मेळाव्यात एकजुटीतून संघर्षाचा नारा

Homeताज्या बातम्याशहरं

रेल्वे हमाल-माथाडींच्या मेळाव्यात एकजुटीतून संघर्षाचा नारा

अहमदनगर (प्रतिनिधी)-  हमाल, माथाडींचे संघर्षाशिवाय प्रश्‍न सुटणार नाही. हमाल-माथाडींच्या व्यापक एकजुटीने प्रश्‍न सोडविणे सोपे जाते. संघर्षमय जीवन

जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
Ahmednagar : नेहरू मार्केटला भीषण आग | Loknews24
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

हमाल, माथाडींचे संघर्षाशिवाय प्रश्‍न सुटणार नाही. हमाल-माथाडींच्या व्यापक एकजुटीने प्रश्‍न सोडविणे सोपे जाते. संघर्षमय जीवन जगणार्‍या हमाल, माथाडी यांना हक्कासाठी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन रेल्वे माथाडी व कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियनचे कॉ. रमेश बाबू यांनी केले. तर हमाल, माथाडींच्या प्रश्‍नासंदर्भात राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी रेल्वे विभागाशी पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

अहमदनगर रेल्वे स्थानक मालधक्का येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न रेल्वे माथाडी कामगार युनियनच्या फलकाचे अनावरण व हमाल-माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कॉ. रमेश बाबू बोलत होते. यावेळी सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रा. डॉ. महेबूब सय्यद, कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे, हॉकर्स युनियनचे अध्यक्ष संजय झिंजे, अहमदनगर युनिट अध्यक्ष कॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष कॉ. मधुकर पाटोळे, सचिव कॉ. गणेश कंदूर, सहसचिव कॉ. गणेश जाधव, कॉ. सुरेश निरभवणे, कॉ. पोपट लोंढे, कॉ. वसंत पेटारे, कॉ. रोहिदास भालेराव, कॉ. विलास उबाळे, सोलापूर युनिटचे अध्यक्ष ताजोद्दिन शेख, उपाध्यक्ष जगदीश उमराणी, पंढरपूर युनिटचे अध्यक्ष उत्तरेश्‍वर जाधव, उपाध्यक्ष विठ्ठल कोळी, सचिव नितीन शिंदे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कॉ. रमेश बाबू म्हणाले की, हमाल-माथाडी कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना कार्यरत आहे. भारतातील रेल्वेत कार्यरत माथाडी यांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला जाणार आहे. रेल्वेचा नफा वाढवणारे हमाल-माथाडींच्या प्रश्‍नाकडे रेल्वे विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही, आराम करण्यासाठी रेस्ट रुम व स्वच्छता गृहाची सोय नाही. त्यांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात नाही. हमाल-माथाडींच्या या प्रश्‍नासंदर्भात राज्य अधिवेशन घेऊन ऑल इंडिया स्तरावर व्यापक लढा उभारण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

प्रारंभी रेल्वे स्थानक मालधक्का येथे युनियनच्या फलकाचे अनावरण आर्थिक सर्वहरा वर्गाचे प्रतिक असलेल्या लाल रंगाच्या रेबीन व सामाजिक सर्वहरा वर्गाचे प्रतिक असलेल्या निळ्या रंगाच्या रेबिनची गाठ बांधून करण्यात आले. तसेच मेळाव्यात हमाल बांधवांच्या हातात हात देत एकजुटीचा नारा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. विलास उबाळे यांनी केले. युनिट अध्यक्ष कॉ. प्रशांत गायकवाड यांनी शहरातील सर्व कष्टकरी कामगार संघटना सर्व श्रमिकांच्या प्रश्‍नांसाठी एकजुटीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या मेळाव्यास अहमदनगर हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे व कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी युवा शाहीर हर्षवर्धन मेढे यांनी शहिद भगतसिंहाचे क्रांतीकारी गीत सादर केले. त्यांचा नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. भगवान शेंडे, कॉ. शरद वाकचौरे, कॉ. सागर पोळ, कॉ. पंडीत झेंडे, कॉ. संजय शिरोळे, कॉ. संजय पाडळे, कॉ. विनोद कंदूर, कॉ. नितीन सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS