पत्रकार हत्येशी मंत्री तनपुरेंचा संबंध ; शिवाजीराव कर्डिले यांचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार हत्येशी मंत्री तनपुरेंचा संबंध ; शिवाजीराव कर्डिले यांचा आरोप

राहुरी येथील एका सप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

मनपाचे वसुली कर्मचारी घेतात हप्ता ; सत्ताधारी नगरसेवकाचा महासभेत जाहीर आरोप
आकारी पडीत शेतकर्‍यांचा लढा उभारणार्‍यांचे खरे योगदान ः धुमाळ
श्रीगोंद्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा ठाकरे गटाकडून निषेध

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी येथील एका सप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला.

सहा एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. कर्डिले यासंबंधी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत.  ते म्हणाले, ‘पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे, की राहुरीतील 18 एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा कळाले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकर्‍याच्या नावावर आहे; मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रॅन्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या; मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. 18 एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल, असा आरोप कर्डिले यांनी केला. ’राहुरीत तनपुरे कुटुंबाची ही पद्धत आहे. एखादी मालमत्ता बळकवायची असेल, तर तेथे आधी आरक्षण टाकतात, सौदा करतात आणि नंतर आरक्षण उठवून आणतात. त्यामुळे या प्रकरणात 18 एकरशी संबंधित जे जे कोणी सहभागी असतील, त्यांच्याविरुद्ध संगनमताने दातीर यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. अशी मागणी त्यांनी केली. दातीर यांच्या पत्नीच्या जीवालाही धोका आहे. आम्ही त्यांना भेटून आलो. त्या वेळी त्यांनी बंदोबस्त देण्याची मागणी केली. मी आमदार असल्याच्या काळात या मतदारसंघात अशा घटना झाल्या नाहीत. अलीकडे अशा चार घटना घडल्या आहेत. दातीर यांची हत्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. कारण त्यांना भीती आहे, की भेटायला गेलो तर दातीर यांची पत्नी आपल्यावरच आरोप करेल. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढा गंभीर गुन्हा होऊ शकत नाही. यामध्ये खोट्या आरोपींना अटक न करता खर्‍या आरोपींना अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनाही आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहोत. येत्या पंधरा दिवसांत कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन करू. दातीर यांच्या नातेवाइकांना आणि त्यांच्या समाजाला याची माहिती आहे; मात्र आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही कर्डिले यांनी सांगितले.

COMMENTS