एखादा पुढं जात असेल, तर त्याला पुढं जाऊच द्यायचं नाही, याला खेकडा वृत्ती म्हणतात. काँग्रेसमध्ये तर ही वृत्ती भिनली आहे.
एखादा पुढं जात असेल, तर त्याला पुढं जाऊच द्यायचं नाही, याला खेकडा वृत्ती म्हणतात. काँग्रेसमध्ये तर ही वृत्ती भिनली आहे. काँग्रेसची सध्या जी अवस्था झाली आहे, ती याच वृत्तीमुळं. विरोधकांशी लढण्याऐवजी स्वकीयांशी लढण्यातच काँग्रेसजणांची शक्ती र्खच होत असते. त्यामुळं विरोधक त्याचा अचूक फायदा उठवितात.
देशावर एकेकाळी राज्य केलेल्या काँग्रेसच्या हाती आता इनमिन चार राज्यं आहेत. त्यातही पंजाब आणि राजस्थान काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन गट परस्परांचं म्हणजेच काँग्रेसचंच खच्चीकरण करण्यात गुंतले आहेत. जनमाणसात स्थान असलेल्यांना ताकद द्यायची नाही आणि हुजरेगिरी करणार्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा, ही काँग्रेसी वृत्ती पंजाबमध्येही दिसते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिद्धू यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाहीत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनाही हा वाद मिटवण्यात काही रस आहे, असं दिसत नाही. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आणण्यात अमरिंदर सिंग यांचा मोठा वाटा आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांना सर्वाधिकार दिल्यानंच त्यांनी ही करामत करून दाखविली. पुढच्या वर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस एकसंघपणे निवडणुकीला सामोरी जाईल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्याचं कारण नवज्योत सिद्धू आणि आणखी काही सिंग विरोधकांचं राजकारण. ते सिंग यांचे पाय ओढत आहेत. पंजाबच्या मंत्रिमंडळात असतानाही सिद्धू शांत नव्हते. त्यांच्या उचापतखोरीमुळंच त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आलं. नंतर तर त्यांना मंत्रिपदावरून डच्चू देण्यात आला. भाजपत जाता जाता काँग्रेसकडं आलेल्या सिद्धू यांचा काँग्रेसला तसा काहीच फायदा झालेला नाही, झालं असेल, तर ते नुकसानच; परंतु पक्षश्रेष्ठी त्यावर काहीच करायला तयार नाहीत. जनमाणसांत स्थान असलेल्यांचे पाय ओढायचे आणि हुजर्यांना महत्त्व द्यायचं, ही काँग्रेसजणांची वृत्ती आहे. त्यामुळं पक्षाचंच नुकसान होतं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. कॅ. सिंग हे जनमाणसातील नेते आहेत, तर सिद्धू हे खुशामतखोर आहेत. आताही सिद्धू खूप आक्रमक होताना दिसत आहेत. अधूनमधून त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करायची उबळ येते. बरं समोर येऊन बोलायची हिंमत नाही, कॅ. सिंग यांचं नाव घ्यायची ताकद नाही. काँग्रेस अशा बांडगुळांना कशासाठी पोसते, असा प्रश्न निर्माण होतो. आताही सिद्धू यांनी कॅ. सिंग यांचं नाव न घेता कठोर टीका केली. एका खटल्याचा उल्लेख करून त्यांनी जबाबदारीपासून पळून जाणं आणि अॅँडव्होकेट जनरलला बळीचा बकरा बनविणं म्हणजे नोकरशाही नियंत्रणात नसल्याचं लक्षण आहे, अशी टीका केली. गृहमंत्र्यांचं अपयश लपविण्यासाठी अॅडव्होकेट जनरलचा बळी देण्यात आला. अॅडव्होकेट जनरल कुणाच्या नियंत्रणाखाली आहेत, असा सवाल करून गृहमंत्री जबाबदारीपासून पळ काढीत आहेत, असा आरोप सिद्धू यांनी केला. गृहमंत्रिपद मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्याकडं आहे, त्यामुळं सिद्धू यांचा रोख कुणाकडं आहे, हे समजायला हरकत नाही. सिद्धू यांनी जरी सिंग यांचं नाव घेतलं नसलं, तरी गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीवर सिद्धू यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं कोटकपुरा गोळीबार प्रकरणाचा तपास करणार्या विशेष तपास पथकाची नियुक्ती रद्द केली. या पथकाचं प्रमुख कुंवर विजय प्रताप सिंग यांना काढून टाकलं. त्यांना नव्यानं तयार झालेल्या एसआयटीमध्ये ठेवू नये, असा सल्ला न्यायलयानं दिला. त्यामुळं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. सिद्धू यांनीही याच मुद्यावर कॅ. सिंग यांना लक्ष्य केलं असून त्यामुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालं आहे. काँग्रेसचे पंजाब प्रभारी प्रभारी हरीश रावत यांनी कॅप्टन सिंग आणि सिद्धू यांच्यातील दरी मिटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. या दोघांमध्ये दोन बैठका झाल्या. सिद्धू पुन्हा मंत्रिमंडळात येणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या; परंतु सिद्धू यांचा स्वभाव काही बदलायला तयार नाही. त्यामुळं कॅ. सिंग त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला तयार नाहीत. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नातीच्या लग्नानिमित्त स्नेहभोजन ठेवलं. विरोधकांसह काँग्रेसमधील नेत्यांनीही तिथं हजेरी लावली; परंतु सिद्धू यांनी मात्र तिथं हजेरी लावली नाही. त्यामुळं दोघांतील अंतर आणखी वाढत गेलं. ’हम तो डुबेंगे सनम’ म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. हे सरकार किंवा पक्षाचं अपयश नसून ते एका व्यक्तीचं अपयश आहे, असं नमूद करताना त्यांचा अंगुलीनिर्देश कॅ.सिंग यांच्याकडं आहे. सिद्धू हे आजकाल विरोधी पक्षाच्या राजकारण्यांप्रमाणं आपल्याच सरकारच्या अपयशावर बोट ठेवत आहेत. थेट मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी टक्कर घेण्याचं धाडस मात्र त्यांच्यात नाही. एका व्यक्तीनं दोषींसोबत हातमिळवणी केली, असं ते म्हणतात; परंतु व्यक्ती कोण हे सांगण्यास नकार देतात. पाठीमागून वार करण्याची सिद्धू यांची वृत्ती कॅ. सिंग यांना मान्य नाही. आतापर्यंत ते सिद्धू यांच्या टीकेकडं दुर्लक्ष करायचं; परंतु आता मुख्यमंत्रीही आक्रमक झाले असून त्यांनी सिद्धू यांना थेट आव्हान देऊन आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवा, असं म्हटलं आहे. सिंग यांनी सिद्धू यांना पतियालाळातून आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. सिद्धूंना आपल्याविरोधात निवडणूक लढवायची असेल, तर त्यांना तसं स्वातंत्र्य आहे; पण त्यांची अवस्था जनरल जे. जे. सिंग यांच्यासारखी होईल. जनरल सिंग यांनी शिरोमणी अकाली दलाच्या तिकिटावर अमरिंदर सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती; पण त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. सिद्धू काँग्रेसचे सदस्य आहेत की नाही? हे त्यांनी स्पष्ट करावं. असतील तर मग मुख्यमंत्री आणि सरकारविरोधातील त्यांच्या सततच्या वक्तव्यांवरून पक्षातील शिस्तभंग मानली जाईल. काँग्रेसमधील असंतुष्ट गटानं आपली भूमिका स्पष्ट करावी. कारण ते पक्षातील शिस्त तोडण्यात व्यग्र आहेत. भाजप त्यांना पुन्हा घेणार नाही. शिरोमणी अकाली दलही त्यांना त्यांच्यावर संतप्त आहे, असं कॅ. सिंग म्हणाले.पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचं अमरिंदर सिंग यांनी कौतुक केलं. जाखड हे पक्षासाठी चांगलं काम करत आहेत आणि आपली जबाबदारी पूर्णपणे उत्तम प्रकारे पार पाडत आहे. यामुळं सिद्धू यांची जाखड यांच्या जागेवर नेमणूक होण्याचा प्रश्नच येत नाही, असं अमरिंदर सिंग म्हणाले. सिद्धू यांनी ’सोशल मीडिया’ अकाउंटवरून काँग्रेसचं नाव हटवलं. यासोबतच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात वक्तव्य केलं आहे. कोटकपुरा आणि बहिबल कला गोळीबार प्रकरणी ’हम तो डुबेंग सनम, तुम्हे भी ले डुबेंगे, असं सिद्धूंनी सोशल मीडियावर लिहिलं. त्यांचा रोख कुणाकडं आहे आणि ते कुणाला टार्गेट करू इच्छितात, हे कळतं.
COMMENTS