खड्डा दुसर्‍यासाठी, स्वतःचाच कर्दनकाळ

Homeसंपादकीयदखल

खड्डा दुसर्‍यासाठी, स्वतःचाच कर्दनकाळ

स्वच्छ असलेल्यांनाच इतरांकडं बोटं दाखवण्याचा अधिकार असतो; परंतु वादग्रस्त चारित्र्याची माणसं दुसर्‍यांना दोषी ठरवायला जातात, दुसर्‍यांसाठी खड्डा खणतात आणि त्यात पडतात, असं बर्‍याचदा घडतं.

चाचणी घोटाळ्यातील कंपनी भाजपशी संबंधित
वडिलांप्रमाणेच सरन्यायाधीश बनणारे न्या. चंद्रचूड दुसरे!
एनडीए चे ‘मन’से !

स्वतः स्वच्छ असलेल्यांनाच इतरांकडं बोटं दाखवण्याचा अधिकार असतो; परंतु वादग्रस्त चारित्र्याची माणसं दुसर्‍यांना दोषी ठरवायला जातात, दुसर्‍यांसाठी खड्डा खणतात आणि त्यात पडतात, असं बर्‍याचदा घडतं. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्याबाबतीत तसंच घडलं आहे. 

एका खुनाचा आरोप असलेल्या, गैरव्यवहारांत सहभागी असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची पाठराखण मुंबईच्या पोलिस आयुक्त असलेल्या अधिकार्‍यानं करावी, यात निस्पृहपणा म्हणत नाही. पोलिस आयुक्त असेपर्यंत शंभर कोटी रुपयांची खंडणी असलेल्या आरोपावर गुन्हा दाखल करावा किंवा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं, असं परमवीर सिंग यांनाही वाटलं नाही. बदली झाल्यानंतर मात्र आरोप करावेसे वाटले. बदलीला ते मॅट, कॅटमध्ये आव्हान देऊ शकले असते; परंतु तसं न करता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिंग यांच्या चुकांवर बोट ठेवलं, म्हणून त्यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप करण्यात आला. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना इतरांकडं एक बोट दाखविताना चार बोटं आपल्याकडं असतात, याचा विसर पडला. ज्युलिलिओ रिबेरो यांनी परमबीर सिंग यांच्याविषयी लिहिलेल्या लेखात त्यांच्या अनेक गैरकृत्यांचा पर्दाफाश केला. चिखलात दगड मारला, की काही शिंतोडे आपल्यावरही उडतात, याची जाणीवच सिंग यांना झाली नाही. सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाची आता सीबीआय चौकशी सुरू आहे. त्याचवेळी मुंबई पोलिस दलात सिंग यांच्या हाताखाली काम केलेल्या काही अधिकार्‍यांनीच आता त्यांच्यावर गैरकारभाराचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काहींनी पोलिस महासंचालकांना तर काहींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्या कृष्णकृत्यांचा पाढा वाचला आहे. सिंग यांना आपल्या लेटरबाँबचं बुमरँग आपल्यावरही उलटू शकतं, याची जाणीवच झाली नव्हती. अधिकारी स्वच्छ असला, की त्याच्याकडे बोट दाखवायला जागा उरत नाही. यापूर्वी तुकाराम मुंढे, अरविंद इनामदार, त्यागी यांच्यासारख्या कितीतरी अधिकार्‍यांनी आपल्या वर्तनातून ते दाखवून दिलं आहे; परमवीर सिंग त्या परंपरेत मोडणारे नक्कीच नाहीत. त्यांना मुंबईच्या पोलिस आयुक्तांची खुर्ची हवी होती आणि ती काढून घेतल्यानंच त्यांनी लेटरबाँब टाकला. एरव्ही प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया देणारे सिंग गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होणार्‍या आरोपाबाबत मात्र मौन बाळगून आहेत. आरोपकर्त्यांनी काही उदाहरणांसह सिंग यांच्या गैरकारभाराची लक्तरं वेशीवर टांगल्यानं सरकारच्या हाती आयतं कोलित आलं. त्यातच गावदेवी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात फिर्यादही दाखल झाल्यानं सरकारला त्यांची चौकशी करणं भाग होतं. त्यानुसार परमबीर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं दिले आहेत.

परमबीर यांच्याविरुद्ध गावदेवी पोलिस ठाण्यातील तत्कालीन निरीक्षक अनुप डांगे यांनी तक्रार केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिंग यांची प्राथमिक चौकशी करण्याचा हा गृह विभागाचा आदेश 20 एप्रिलचा असून पोलिस महासंचालक संजय पांडे यांना हे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश देताना डांगे यांनी 2 फेब्रुवारी 2021 रोजी केलेली तक्रार आणि याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी 25 मार्च 2021 रोजी दिलेला अहवाल तसंच मुंबईचे सहपोलिस आयुक्त (गुन्हे) यांचा 7 एप्रिल 2021 रोजीचा अहवालही सोबत जोडण्यात आला आहे. डांगे यांनी केलेल्या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची प्राथमिक चौकशी करून याबाबतचा अहवाल शासनास लवकरात लवकर सादर करावा, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. डांगे यांना गेल्यावर्षी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर हे निलंबन रद्द करण्यासाठी सिंग यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप डांगे यांनी केला होता. याबाबत त्यांनी राज्याच्या अतिरिक्त गृह सचिवांना दोन फेब्रुवारी रोजी पत्र लिहिलं होतं. याचा अर्थ हे पत्र सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याच्या आधीचं आहे. विधिमंडळात तोपर्यंत अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण चर्चेला आलं नव्हतं. त्यामुळे सू़डबुद्धीनं तक्रार केली किंवा करायला भाग पाडली, असंही म्हणता येत नाही. या पत्रात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी परमबीर यांचं कनेक्शन असल्याचा आरोप डांगे यांनी केला होता. डांगे यांच्यानंतर अकोला येथे पोलिस नियंत्रण कक्षात असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी परमबीर यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला आहे. सिंग हे ठाण्यात पोलिस आयुक्त असताना घाडगे हे कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात सेवेत होते. सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल्स इथं कार्यालय आहे. त्या माध्यमातून त्यांनी हजारो कोटी रुपये गुंतवले आहेत. तसंच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये व्यवसाय चालवतो. तिथंही भ्रष्टाचारातून आलेले पैसे गुंतवल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय अधिकार्‍यास फक्त एकच शासकीय निवासस्थान बाळगण्याची परवानगी असते; पण सिंग हे ठाणे शहराचे पोलिस आयुक्त असताना दोन शासकीय निवासस्थानांचा वापर करत होते. आपण तक्रार केल्यानंतर त्यांनी 29 लाख 43 हजार 825 एवढी रक्कम भरणा केली आहे. सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना त्यांना फक्त दोन कुक व एक टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची परवानगी होती; पण त्यांनी आपल्या निवासस्थानी एसआरपीएफचे सहा पोलिस कर्मचारी आणि ठाणे येथील नेमणुकीतील 14 पोलिस कर्मचारी असा वापर केला. तसंच मुंबई येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबासाठी एसआरपीएफचे दहा पोलिस कर्मचारी आणि तीन वाहन चालक बेकायदेशीरपणे वापरून त्यांनी पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग करून भष्टाचार केलेला आहे.

फ्रान्सिस डिसिल्वा आणि प्रशांत पाटील असे दोघजण खासगी व्यवहारासाठी व बदल्यांमधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा करत होते. त्या दोघांनाही सिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे याबाबत संपूर्ण माहिती आहे. सिंग यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात दुसर्‍याच्या नावे 21 एकर जमीन खरेदी केलेली आहे. सिंग कल्याण येथे पोलिस उपायुक्त होते. तिथे प्रकाश मुथा हे त्यांचे मित्र होते. त्याच्यामार्फत सिंग यांनी रिव्हॉल्व्हर लायसन्सच्या कामासाठी 10 ते 15 लाख रूपये घेवुन लायसन्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच बिल्डर्सची काम करून देण्यासाठी कोट्यवधी रूपयांची देवाण घेवाण करून सेंटलमेंट करून केली जात होती, असाही आरोप करण्यात आला आहे. पोलिस निरीक्ष म्हणून नेमणूक करताना सुमारे दीडकोटी रुपये घेतल्याशिवाय बदल्या केल्या जात नव्हत्या. सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनच्या उपायुक्तांकडून प्रत्येकी 40 तोळे सोन्याचं बिस्कीट, सहायक पोलिस आयुक्तांकडून प्रत्येकी 20 ते 30 तोळयाचं सोन्याचे बिस्कीट व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून सुमारे 30 ते 40 तोळे सोन्याचे बिस्कीटे घेत होते असा आरोप करण्यात आला आहे. जो अधिकारी सिंग यांचे बेकायदेशीर काम करण्यास मनाई करत असे, त्याची बदली नियंत्रण कक्षात केली जात होती किंवा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असत. सिंग यांनी बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला. यासाठी त्यांनी एक एजंट राजू अय्यर याची नेमणूक केली. अय्यर याच्याकडं पैसे जमा झाल्यानंतर बदल्या होत असत. सिंग यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूर येथे एक व्यवसाय आहे. त्यात परमबीर सिंग यांनी दोन हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यात त्यांना पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची गोपनीय माहिती मिळाली असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. पत्नीच्या माध्यमातून सिंग यांची इंडिया बुल्स येथे पाच हजार कोटींची गुंतवणूक आहे. सिंग ठाण्याचे आयुक्त असताना बिल्डर जितू नवलाणी यांच्याकडं एक हजार कोटींची गुंतवणूक वेगवेगळ्या व्यवसायात केली, असा आरोप या पत्रात करण्यात आला असून या पत्रावरही चौकशी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS