कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील राज्य सरकारकडून
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील राज्य सरकारकडून त्यांना पुरेशा प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. पूरबाधित शेतकर्यांना नुकसान भरपाईचा शासन आदेश बदलून 2019 प्रमाणे मदत जाहीर करा, अन्यथा येत्या रविवारी 05 सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत हजारो शेतकर्यासह जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसह बुधवारपासून (दि.1) प्रयाग चिखली ते नृहसिंहवाडी अशी पंचगंगा परिक्रमा आंदोलन पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. यावेळी पुरग्रस्तांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रयाग चिखली या तीर्थक्षेत्री त्यांनी अभिषेक घालून पदयात्रेला सुरूवात केली. पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही. अजूनही मदत मिळाली नाही. पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरु झाले असल्याने फी कशी भरायची? असा सवाल यावेळी शेट्टींनी विचारला होता. शेतकर्यांना 2019 साली आलेल्या महापुराप्रमाणे मदत मिळायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये जुलै मध्ये महापूर आला. यामध्ये शेती,घरे, दुकाने यांची अतोनात हानी झाली. मात्र 2019 सालच्या तुलनेत यावर्षी अत्यंत तोकडी मदत केली असल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. तेंव्हाप्रमाणे यावर्षी शासनाने मदत करावी, अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचावर टीकास्त्र सोडले आहे. महापुरात नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकर्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पूरग्रस्त शेतकर्यांचा आक्रोश मोर्चावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. राज्य सरकारने पूरग्रस्त मदतीचा निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार आहे. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. यावेळी आक्रोेश पुरग्रस्तांचा पदयात्रा सुरू होताना सावकार मादनाईक, डॉ. जालंदर पाटील, वैभव कांबळे, अजित पवार, बाळासाहेब पाटील, रंगराव पाटील, राजाराम देसाई, सागर शंभुशेटे, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ राजू शेट्टी, सम्मेद शिखरे, सचिन शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
राज्यात पुरामुळे सांगली आणि कोल्हापुरचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्यांची संपूर्ण शेती वाहून गेली असून, स्थानिकांची घरे पाण्यात बुडाली. अनेकांचे संसार मातीमोल झाले आहेत. मात्र, सरकारकडून या पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच 2019 च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कुणाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS