Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सध्याच्या चित्रपटांतून साहित्याचा गाभा हरवतोय : जेयामोहन यांची खंत

पुणे : सध्याच्या चित्रपटांमध्ये साहित्याचा मूळ आत्मा हळूहळू लुप्त होत चालला असून, त्यामुळे एकसारख्या आशयाचे चित्रपट वारंवार निर्माण होत आहेत. नवतेचा अ

ढाकणे यांची गांधीगिरी करत पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी
राकेश आणि शमिता यांनी दिला नात्याला पूर्णविराम.
संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस

पुणे : सध्याच्या चित्रपटांमध्ये साहित्याचा मूळ आत्मा हळूहळू लुप्त होत चालला असून, त्यामुळे एकसारख्या आशयाचे चित्रपट वारंवार निर्माण होत आहेत. नवतेचा अभाव आणि पुनरावृत्तीचे वाढते प्रमाण हे याचेच द्योतक आहे, अशी परखड मांडणी ज्येष्ठ तमिळ लेखक व पटकथालेखक बी. जेयामोहन यांनी केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (झखऋऋ) अंतर्गत झालेल्या विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘कादंबरी ते चित्रपट’ या विषयावर ते बोलत होते.
या व्याख्यानप्रसंगी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी जेयामोहन यांचा परिचय करून दिला. आजचे अनेक चित्रपट हे आधीच्या चित्रपटांवर आधारलेले असल्याने साहित्याचा मूळ गाभा हरवतो, असे जेयामोहन यांनी स्पष्ट केले. परिणामी, पाच-सहा ठरावीक आशयसूत्रेच वारंवार दिसतात आणि काही चित्रपटांत तर ती सर्व सूत्रे एकाच वेळी वापरली जातात, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कादंबरीवर आधारित चित्रपट बनवताना कादंबरीचा आशय शब्दशः उचलण्याऐवजी स्वतंत्र कथासूत्र तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कादंबरीतील संवाद जस्सेच्या तसे वापरण्याऐवजी नवे, संक्षिप्त आणि परिणामकारक संवाद लिहावेत. चित्रपट हे दृश्यप्रधान माध्यम असल्याने संवादांपेक्षा दृश्यांची ताकद अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे कादंबरीतील तत्त्वज्ञानात्मक चर्चा चित्रपटात न आणता, प्रभावी दृश्यरचनेवर भर देऊन पटकथा घडवावी, असा सल्लाही त्यांनी दिला. संपूर्ण कादंबरीचा गाभा, प्रमुख पात्रे आणि त्यातील नाट्य घेऊन चित्रपटाची रचना करणे अधिक परिणामकारक ठरते, असे ते म्हणाले. कादंबर्‍यांचे कलात्मक आणि व्यावसायिक असे दोन प्रमुख प्रकार असल्याचे स्पष्ट करताना जेयामोहन यांनी कलात्मक कादंबर्‍यांत अभिजात, आधुनिकतावादी आणि आकृतीबंद नसलेल्या कादंबर्‍यांचा समावेश होतो, असे सांगितले. अभिजात कादंबर्‍या तत्त्वज्ञानात्मक चर्चेसह संस्कृतीचे यथार्थ चित्रण करतात. आधुनिकतावादी कादंबर्‍या व्यक्तिवादी असून एका व्यक्तीभोवती फिरणारे कथानक आणि अंतर्गत विरोधाभास यांमुळे त्या चित्रपटासाठी अधिक उपयुक्त ठरतात. आकृतीबंद नसलेल्या कादंबर्‍यांत तुटक मांडणी, मानसिकतेचे सूक्ष्म चित्रण असते; मात्र अशा मोठ्या कलात्मक कादंबर्‍या चित्रपटासाठी सहसा अनुकूल नसतात, असे त्यांनी स्पष्ट केले. याउलट आधुनिकतावादी व व्यावसायिक स्वरूपाच्या कादंबर्‍या चित्रपट माध्यमाशी अधिक सुसंगत ठरतात. अगदी तद्दन व्यावसायिक कादंबरीतही कुशल दिग्दर्शक चांगला चित्रपट घडवू शकतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या वैयक्तिक अनुभवांचा उल्लेख करताना जेयामोहन म्हणाले की, त्यांनी दोन वर्षे भिकारी म्हणून देशभर भ्रमंती केली. एका खुनाचा अनुभव त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यातूनच ‘येळम उलगम’ ही कादंबरी तसेच ‘नान कडाउल’ हा चित्रपट साकारला. ही कादंबरी आता ‘द अबीस’ या नावाने इंग्रजीत प्रसिद्ध होत आहे. ‘कादल’ या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल 700 पानांची कादंबरी लिहिली होती, मात्र चित्रपट यशस्वी ठरला नाही. तरीही, 15 वर्षांनंतर ती कादंबरी प्रकाशित होत आहे. तसेच दुसर्‍या लेखकाच्या ‘पोनियनसेल्वन’ या कादंबरीवरून त्यांनी पटकथा लिहिली आणि त्यातून ‘कल्की’ हा चित्रपट तयार झाला, असेही त्यांनी सांगितले. चित्रपट आणि साहित्य यांचे नाते पुन्हा दृढ होणे आवश्यक असून, त्यातूनच चित्रपटांना नवी दिशा आणि खोली मिळू शकते, असा सूचक संदेश जेयामोहन यांच्या या मांडणीतून मिळतो.

COMMENTS