Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे नेते राज के. पुरोहित यांचे निधन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. प्रकृती

भाजपचा विजय आणि प्रादेशिक पक्षांची धुळधाण !
भाजपला 20 जानेवारीला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष
राजकारणातील हरवलेला संवाद .. !

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना 15 जानेवारी रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात एक अनुभवी, अभ्यासू व जनतेशी घट्ट नाळ जोडलेला नेता हरपला आहे.
राज के. पुरोहित हे मुंबई भाजपमधील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. उत्तर भारतीय समाजाचे प्रतिनिधी नेते म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख होती. दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा जनाधार होता. त्यांनी तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून काम केले. मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघातून ते 1990, 1995, 1999 आणि 2004 या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते. 1995 ते 1999 या काळातील युती सरकारमध्ये त्यांनी कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री म्हणून कार्यरत असताना मुंबईतील भाडेकरू आणि मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आमदार आणि मंत्री म्हणून काम करत असतानाच पक्षसंघटनेतही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. पक्षाच्या अडचणीच्या काळातही त्यांनी निष्ठेने संघटनेसोबत राहून काम केले. विशेषतः मुंबईतील अमराठी आणि उत्तर भारतीय मतदारांना भाजपशी जोडण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. अलीकडच्या वर्षांत दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर झाले होते. मात्र, त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभव पक्षासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले. नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र आकाश पुरोहित वॉर्ड क्रमांक 221 मधून विजयी झाले होते. राज के. पुरोहित यांच्या निधनाने अभ्यासू, स्पष्टवक्ते आणि संघटनात्मक बांधिलकी जपणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

COMMENTS