आठ किलोमीटर अंतरावर आढळले मृतदेहपणजी : गोव्यात दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या या दोन्ही मृतदेहां

आठ किलोमीटर अंतरावर आढळले मृतदेह
पणजी : गोव्यात दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या या दोन्ही मृतदेहांप्रकरणी गोवा पोलिसांनी 37 वर्षीय रशियन नागरिक अलेक्सी लिओनोव्ह याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात दोन्ही महिलांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मृत महिलांची नावे एलेना कस्थानोवा (37) आणि एलिना वानीवा (37) अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघींचाही चाकूने गळा चिरण्यात आला होता. तसेच त्यांच्या हातांना पाठीमागे दोरीने बांधण्यात आले होते, ज्यामुळे हा पूर्वनियोजित गुन्हा असण्याची शक्यता बळावली आहे. ही घटना उघडकीस आली तेव्हा, गुरुवारी रात्री अरंबोल परिसरातील एका भाड्याच्या घरात कस्थानोवाचा मृतदेह आढळून आला. घरमालकिणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री अकरानंतर ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस एका खुनाचा तपास करत असतानाच, घटनास्थळापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरजिम परिसरात दुसर्या रशियन महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासात समोर आले की, वानीवा ही आरोपी आणि कस्थानोवा या दोघींची परिचित होती. माहितीनुसार, लिओनोव्ह आणि कस्थानोवा गेल्या महिन्याभरापासून अरंबोल येथे भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. 14 जानेवारी रोजी त्यांच्यात तीव्र वाद झाला होता. या वादानंतर कस्थानोवाने शेजारी राहणार्या एका रशियन महिलेकडे मध्यस्थीची विनंती केली होती, मात्र तिने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
शेजारील महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही वेळानंतर तिला कस्थानोवाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. ती खोलीकडे धाव घेत असताना आरोपीने पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारून पलायन केले होते.

COMMENTS