Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेबाबत फलक लावून निषेध

रस्ता कृती समितीचा प्रयोग; प्रशासनास जाग येणार? देवळाली प्रवरा : अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० हा आता केवळ वाहतुकीचा मार्ग न राह

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही मनमाड महामार्ग रखडलेला
नगर-मनमाड महामार्गावर अपघात ; तरुण ठार 
Yeola : नगर – मनमाड महामार्ग रोखला…. (Video)

रस्ता कृती समितीचा प्रयोग; प्रशासनास जाग येणार?

देवळाली प्रवरा : अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० हा आता केवळ वाहतुकीचा मार्ग न राहता अपघातांचा महामार्ग, वाहतूक कोंडीचा अड्डा आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे. ५५ बळी, तरीही प्रशासन मुकेच. वारंवार इशारे देऊनही शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या अहिल्यानगर-मनमाड रस्ता कृती समितीने प्रशासनाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बोलके फलक लावून थेट सवाल उपस्थित केला आहे.

याबाबत रस्ता कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी सांगितले की, “राहुरी तालुक्यात गेल्या एका वर्षात नगर–मनमाड रस्त्यावर तब्बल ५५ जणांनी आपला जीव गमावला आहे. शेकडो जण कायमचे अपंग झाले.   राजकीय नेते फक्त कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करतात, प्रत्यक्षात मात्र रस्त्याचे वाटोळे सुरू आहे.”

ठेकेदारांकडून होत असलेली कामे ही दुरुस्ती नसून केवळ ठिगळे असल्याचा आरोप करत, “काम रस्त्याचे होते की रस्त्याचे नुकसान करण्याचे, हेच समजत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.  रस्ता कृती समितीने लावलेले फलक हे केवळ निषेधाचे साधन नसून प्रशासनाच्या निष्ठूरतेसमोर धरलेले आरसे आहेत.“हा रस्ता दुरुस्त होणार की आधी आणखी काही बळी हवेत?” असा थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल या फलकांमधून विचारला जात आहे.    

 

अवजड वाहनांची नेमकी व्याख्या काय?

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार नगर-मनमाड रस्त्यावरील वाढते अपघात लक्षात घेता अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मोठमोठे ट्रक, कंटेनर व मालवाहतूक वाहने राजरोसपणे याच रस्त्यावरून धावताना दिसत आहेत.“मग अवजड वाहनांची व्याख्या नेमकी काय? आणि बंदी नेमकी कुणावर आहे?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

 

रस्ता रडतोय, सत्ता हसतेय!

हा राष्ट्रीय महामार्ग सध्या वाहतुकीचा मार्ग कमी आणि उपेक्षेची जखम अधिक ठरतो आहे. येथे डांबर झिजलेले नाही, तर प्रशासनाची संवेदना गळून पडलेली आहे.प्रत्येक अपघातानंतर चौकशीची घोषणा होते, काही दिवस चर्चा होते आणि नंतर पुन्हा विस्मरणाची शांतता पसरते. ही शांतता सुधारण्याची नसून पुढील अपघाताची नांदी ठरत आहे.

 

फलकांतून उसळला जनतेचा संताप

नगर–मनमाड महामार्गावर लावलेल्या फलकांमधून जनतेचा संताप उघडपणे व्यक्त होत आहे.“हातभर खड्डे”, “रुग्णवाहिकेला अडथळा”, “विद्यार्थ्यांचे हाल”, “अपघातास कारणीभूत रस्ता सुधारणार कधी?” अशा थेट सवालांनी प्रशासनाला आरसा दाखवण्यात आला आहे.

COMMENTS