शहरातील मुख्य कचेरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर सोमवारी रात्री बेकायदेशीर लावलेली कोनशिला नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवली.
इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील मुख्य कचेरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर सोमवारी रात्री बेकायदेशीर लावलेली कोनशिला नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवली. बेकायदेशीरपणे पुतळ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केल्याची माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील,नगरसेवक विश्वनाथ डांगे, जयश्री पाटील, खंडेराव जाधव, सुनीता सपकाळ, डॉ.संग्राम पाटील, नंदकुमार पाटील उपस्थित होते.
विश्वनाथ डांगे म्हणाले,”सोमवार रात्री बेकायदेशीरपणे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यांवर सर्व नगरसेवकांचे नावे असणारी असणारा फलक लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली. कोणत्याही नगरसेवकांची परवानगी घेण्यात आली नव्हती.नगरसेविका कोमल बनसोडे यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. जयंतीच्या निमित्ताने तयारी सुरु असेल म्हणून दुर्लक्ष केले. वास्तविक तेथे काही फलक बेकायदेशीरपणे लावले जात होते. याची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पुतळ्याच्या परीसरात धाव घेतली. नगरसेवकांच्या नावाचे फलक दिसल्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली.”
उपनगराध्यक्ष दादासो पाटील म्हणाले,” कोणालाही विश्वासात न घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्याचा घाट घातला गेला होता. सत्ताधाऱ्यांनी गेल्या चार वर्षात विधायक काय केले ? जनतेला गरज आहे ती कामे व्हायला हवीत. चोरून फलक लावला गेला ? यातून काय मिळाले ?
सभागृहात विषय मांडून लोकार्पण सोहळा घ्यावा. कायदा हातात घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.”
अरुण कांबळे म्हणाले,” पुतळ्याच्या चबुतऱ्यावर फलक लावून पुतळ्याचे विद्रुपीकरण केले होते. जयंतीदिनी लोकार्पण घेतले जाणार होते याची कल्पना पुतळा कमिटी नव्हती. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर फलक लावणे ही पुतळ्याची विटंबना आहे. ठराव, बैठका सर्वानुमते निर्णय होणे अपेक्षित होते. सत्ताबदल झाल्यावर मर्जीप्रमाणे कोणीही काही करेल बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई करा.”
नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले,” रात्री उशिरा केली जाते ती विटंबनाच असते. हे काम नव्हे तर विटंबनाच आहे.”
चौकट ;
फौजदारी गुन्हे दाखल करा.. अवैधरित्या पुतळ्याच्या चबुतऱ्या बरोबर छेडछाड करून पुतळ्याची विटंबना करणे. तसेच कोणाची परवानगी नसताना कसलाही नगरपालिकेचा ठराव नसताना केलेला हा प्रकार गंभीर आहे. पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन व काही जागरूक नागरिक व लोकप्रतिनिधी वेळेवर तेथे पोहोचल्यामुळे बेकायदेशीर काम बंद केले. रात्री उशिरापर्यंत जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त करण्यात येत असलेल्या कामाचे निमित्त करून नगरसेवक कोमल बनसोडे, वैभव पवार,माजी नगरसेवक भास्कर कदम हे आर्किटेक्चर विद्याधर ठोमके व त्यांच्या कारागिरांच्या मदतीने अवैधरित्या चबुतऱ्यावर नावांचे फलक लावत होते. एका फलकावर सर्व नगरसेवकांची नावे होती. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यावर शहराच्या हिताच्या आणि शांततेच्या दृष्टीने फौजदारी कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांना देण्यात आले आहे.
फोटो :
इस्लामपूर : डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा मागणीचे निवदेन
पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी..
COMMENTS