नौदलाची कौतुकास्पद कामगिरी

Homeसंपादकीयदखल

नौदलाची कौतुकास्पद कामगिरी

केवळ युद्धाच्या काळातच लष्कराचे तीन विभाग काम करीत असतात, असं नाही, तर नैसर्गिक संकटाच्या काळातही नौदल, वायुदल आणि भूदलाचं काम उठून दिसतं.

आज चौथी फेरी; सत्ता कुणाची ?
मराठा आरक्षण आणि घटनापीठ ! 
निवडणूक आयोग नरमला !

 केवळ युद्धाच्या काळातच लष्कराचे तीन विभाग काम करीत असतात, असं नाही, तर नैसर्गिक संकटाच्या काळातही नौदल, वायुदल आणि भूदलाचं काम उठून दिसतं. आव्हानात्मक कामांची नौदलाला सवय असते. नौदल आणि वायुदल हातात हात घालून काम करतात, तेव्हा हे काम अधिक प्रभावी ठरतं. आताही तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्यांची सुटका करण्यात नौदलानं बजावलेली कामगिरी अभिमानास्पद आहे.

    पूर्वी वर्षा-दोन वर्षांतून चक्रीवादळं यायची. आता चक्रीवादळं आता नवीन राहिली नाहीत. एकामागून एक वादळं येत असतात. गेल्या काही दशकांत झालेल्या चक्रीवादळापैकी तौक्ते चक्रीवादळ सर्वांत भयानक होतं. वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असलं, तरी मुंबई आणि गुजरातमध्ये झालेल्या वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या जहाजांवरील कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात होता. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यानं ‘बॉम्बे हाय’जवळच्या परिसरात ओएनजीसी’चं पी 305 (पापा-305) मोठं जहाज बुडालं. जहाजावर 260 लोक होतं, त्यापैकी 147 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून, इतरांचा शोध दोन दिवसानंतरी सुरूच आहे. मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बे हाय’ असून, तिथं तेल उत्खनन होतं. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ‘ओएनजीसी’चं जहाज पी 305 उभं होतं. कोकण किनारपट्टी ओलांडून तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकलं. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झालं. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्यानं जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागलं. त्यानंतर जहाजावरून नौदलाला एसओपी (जहाज संकटात वा बुडत असल्यास जो संदेश पाठवला जातो, त्याला संक्षिप्त स्वरूपात एसओपी म्हटलं जाते) संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या होत्या. आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्ध नौकांबरोबरच मदतीला ओएनजीसीची समुद्र किनार्‍यालगत असलेली ओएसव्ही आणि तटरक्षक दलाचे आयसीजी समर्थ या दोन नौकाही मदत कार्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. अजून 96 जण बेपत्ता असून नौदलाचं पी 81 हे जहाज समुद्रात इतरांचा शोध घेत आहे. या शोध मोहिमेत किनार्‍यालगत तैनात असणार्‍या एनर्जी स्टार आणि अहल्या या दोन नौकाही उतरवण्यात आल्या होत्या. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौकांनी अन्य जहाजावरील 111 लोकांना वाचवलं आहे, तर ओएसव्ही आणि ग्रेटशिप अहिल्या या दोन्ही नौकांनी 17 लोकांना वाचवलं. ओएसव्ही ओशन एनर्जी या नौकेनं 18 जणांना सुखरूप बाहेर काढलं, असं नौदलाकडून सांगण्यात आलं आहे. वारा प्रभा जहाजही चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलं. जहाज भरकटलं होतं. आयएनएस कोची या युद्धनौकेनं जहाजावरील दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे. चक्रीवादळामुळं गल कन्स्ट्रक्शन जहाज कुलाबा पॉईंटच्या उत्तरेस 48 ‘सागरी मैल दूर गेलं. त्यावर 137 लोक होते. आपत्कालीन मदत करणार्‍या वॉटल लिली आणि इतर दोन जहाजांना मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर आयएनएस तलवार ही युद्धनौकाही अन्य तेल उत्खनन होत असलेल्या क्षेत्रात मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. सागर भूषण आणि एनएस 3 या जहाजांच्या मदतीसाठी ही युद्धनौका पाठवण्यात आली असून, दोन्ही जहाज पीपावाव बंदरापासून दक्षिण पूर्वेस जवळपास 50 सागरी मैल दूर आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. वीस फुटांहून उंच लाटा, ढगांमुळं दाटलेला अंधार आणि भर समुद्रात थैमान घालणारा वारा. नुसत्या कल्पनेनंही थरकाप उडेल, अशा या परिस्थितीत अडकलेल्या जहाजांवरून भारतीय नौदल आणि तटरक्षक दलानं शेकडो जणांना सुखरूप वाचवलं. हे म्हणजे सिंहाच्या मुखात हात घालायचा होता आणि सुरक्षित बाहेर पडायचं होतं, अशा शब्दांत व्हाईस अडमिरल मुरलीधर पवार यांनी या बचाव मोहिमेचं वर्णन केलं आहे. पवार हे भारतीय नौदलाचे डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आहेत. मी गेल्या चार दशकांत पाहिलेल्या सर्वांत खडतर बचाव मोहिमांपैकी ही एक आहे, असं वर्णन त्यांनी या मोहिमेचं केलं, त्यावरून हा काळ किती खडतर होती, याची कल्पना यायला हरकत नाही. तौक्ते चक्रीवादळामुळं अरबी समुद्रात उधाण आलं होतं. त्याचा तडाखा ’बॉम्बे हाय’ तेलक्षेत्राजवळ ओएनजीसीसाठी काम करणार्‍या जहाजांना बसला. हे सगळे बार्ज म्हणजेच सपाट तळ असलेली जहाजं होती आणि ती नांगर टाकून उभी होती. वादळानं समुद्रात पाण्याची पातळी वाढली आणि ही जहाजं सुटून पाण्यात हेलखावे खाऊ लागली. मुंबईबरोबरच गुजरातच्या पिपावाव बंदरापासून समुद्रात साधारण 90-92 किलोमीटरवर आणखी तीन जहाजं भरकटली. सागर-भूषण हे ड्रिल शिप (ऑईल रिग किंवा तेलाचा शोध घेणारे जहाज) 101 जणांसह भरकटलं होतं, तर सपोर्ट स्टेशन तीन या बार्जवर 196 जण होते. ग्रेट शिप अदिती हे आणखी एक जहाजही वादळाच्या तडाख्यात सापडलं. या जहाजांवरील सर्वजण बचावलं असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नौदल आणि तटरक्षक दलाच्या बोटींनी बचाव मोहीम सुरू केली खरी; पण तेव्हा परिस्थिती फारच बिकट होती. ’तौक्ते’ चक्रीवादळ मुंबईजवळच्या समुद्रात घोंघावत होतं आणि त्यानं अत्यंत तीव्र चक्रीवादळाचं रूप धारण केलं होतं. बचावपथकं थेट चक्रीवादळाला जाऊन धडकणार होती आणि तिथून लोकांना वाचवून परत आणणं मोठं खडतर आव्हान होतं. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार या युद्धनौका बचावकार्यासाठी बाहेर पडल्या. आयएनएस कोची मुंबईपासून साठ किलोमीटरपेक्षाही आत समुद्रात असलेल्या पी-305 या बार्जपर्यंत पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले होते आणि त्याच सुमारास हे जहाज बुडालं. समुद्रात भयंकर वादळात अडकलेल्या जहाजावरच्या माणसांची नौदलानं सुटका केली. गडद अंधारात, पाऊस आणि वादळाचा सामना करत साठ जणांना वाचवण्यात आलं. या मोहिमेत हवामान हाच सर्वांत मोठा अडथळा होता. ताशी 148-160 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे, 6 ते 8 मीटर (सुमारे 18-25 फूट) उंचीच्या लाटा, सतत कोसळणारा पाऊस, दाट ढग आणि शून्य दृष्यमानता. अशा परिस्थितीत अंगावर पडणारं पाणी म्हणजे पाऊस आहे की सी-स्प्रे म्हणजे वार्‍यानं उडणारे समुद्राच्या पाण्याचे तुषार आहेत, हेही कळत नाही. जहाज चालवणं हेच तेव्हा एक मोठं आव्हान बनतं. एरव्ही असं वातावरण असेल, तर जहाजाच्या डेकवर कोणी जात नाही. कारण तिथं सगळं निसरडं झालेलं असतं; पण अशा परिस्थितीत लोकांना वाचवायचं काम करायचं आणखी कठीण आणि आव्हानात्मक होतं. भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या विनाशिकांसह आयएनएस तलवार, आयएनएस बियास, आयएनएस बेटवा आणि आयएनएस तेग नौकाही बचावकार्यात सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या युद्धनौका आहेत आणि त्या भक्कम साडेसातशे टन वजनाच्या आहेत. एखाद दुसर्‍या क्षेपणास्त्राचा मारा सहन करून लढत राहाण्याची त्यांची क्षमता आहे. अर्थात समुद्र असा फरक करत नाही. तिथं सराव आणि शिस्त कामाला येते. कोरोना विषाणूच्या जागतिक साथीदरम्यानच हे वादळाचं संकट उभं ठाकलं होतं. त्याविषयी पवार सांगतात, की कोव्हिड असो वा नसो; आमचं ध्येय एकच होतं, लोकांना पाण्यातून वाचवणं.

COMMENTS