कल्याण येथे एका क्लिनिक मधील रिसेप्शनिस्ट मुलीला मारहाण करण्याचं प्रकरण, हे वरवर पाहता मराठी-हिंदी स्वरूपाचा करण्याचा प्रयत्न जरी प्रसार माध्यमा

कल्याण येथे एका क्लिनिक मधील रिसेप्शनिस्ट मुलीला मारहाण करण्याचं प्रकरण, हे वरवर पाहता मराठी-हिंदी स्वरूपाचा करण्याचा प्रयत्न जरी प्रसार माध्यमांनी केला असला तरी, हा प्रामुख्यानं वाद कल्याण परिसरात जो नव वसाहतींचा भाग निर्माण झाला आहे, त्यामध्ये नेतिवली-नांदिवली लगतच्या दिशेने पुढे गेले की, आपल्या नजरेस पडते. बऱ्याच इमारतींची निर्मिती ही बेकायदेशीर आहे. अगदी मच्छी बाजार भरावा तसा इथे इमारतींचा बाजार भरला आहे आणि या इमारतींमध्ये खासकरून उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक कुटुंबांना घर विकण्याचा धंदा फोपावला आहे. यामधून दलालांची मोठी निर्मिती झाली आहे आणि हे दलाल देखील त्या बिल्डरांच्या नात्यागोत्यातले असतात. मग त्यांना प्रसंगी गुन्हेगारी जगतात आसरा देण्याचा भाग, त्यांना खुल्या पद्धतीने दादागिरी करायला लावण्याचा भाग हा सगळा या नव बिल्डर जमातीचा एक उद्देश आहे. यातून सामान्य जनतेला भीती अथवा दहशतीत ठेवणं आणि त्यायोगे त्या बिल्डरांची दहशत त्या परिसरात निर्माण करून कोणीही या बेकायदेशीर बांधकाम आणि त्यांच्या बेकायदेशीर कृती विरोधात काहीही कारवाई करण्यास कोणीही धजावणार नाही; यामुळे असे गुंड पोसले गेले आहेत. अशा गुंडांना नियंत्रित करण्याचे काम मराठी-हिंदी वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांकडून वारंवार केलं जातं; परंतु प्रत्यक्षात कल्याण येथील आरोपी हा मनसेच्या कार्यकर्त्यांना सापडला; तरी, त्यांचं खळखट्याक मात्र इथे चाललं नाही. कारण, त्यांचं खळखट्याक चालताना त्यांचेही हितसंबंध हे सर्व प्रांतांच्या वरच्या जातीयांशी असतात, असे दिसते. खरं म्हणजे मनसेने आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये जे वाद उभे केले, त्यामध्ये त्यांनी आरोपी सापडल्यानंतर त्याला मारहाण करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. मात्र, कल्याणचा हा आरोपी सापडल्यानंतर मनसेने त्याला थेट पोलिसात जमा केला. पोलिसात गेल्यानंतरही ह्या आरोपीची अरेरावी ही सुरू राहिली. कोर्टामध्ये देखील या आरोपीने गहजबच केला आणि तो अनेक मागण्या करत राहिला. परंतु, तेथेही त्याला केवळ तंबी देण्यात आली की, प्रक्रियेत अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याचा अर्थ जो आरोपी आहे, तो आरोपी वरच्या समूहांशी निकटचा संबंध ठेवून आहे आणि त्याला पोसणारी यंत्रणा आहे. त्याच माध्यमातून हे काम साध्य करण्यात येत आहे, असे एकंदरीत दिसत. परंतु, जेव्हा एखाद्या अल्पवयीन मुलीला जी पोटासाठी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपली नोकरी करते आहे. अशा अल्पवयीन मुलीला थेट तिच्या कार्यालयातच मारहाण करणं आणि अतिशय निघृन मारहाण करणं, ही बाब बातम्यांचा विषय झाली असली तरी, आरोपीला ती सहानुभूती अधिक मिळवून देणारी ठरली आहे. आरोपीचे आई-वडील हे डोंबिवली येथील एका पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्यांनी उलटा आरोप करत, त्या मुलीनेच माझ्या मुलाला प्रथम मारहाण केल्याचा कांगावा रचला आहे. अशा प्रकारे हा कांगावा रचण्याची पद्धत जी विकसित होऊ घातलेली आहे, ही या आरोपी आणि गुंडांपेक्षा अधिक भीषण स्वरूपाची आहे. या प्रवृत्ती अशा पद्धतीने जर आरोप करत असतील तर सर्वसामान्य जनतेने नेमका न्याय मागायचा कुठे? आणि नेमकं आपलं आयुष्य जगायचं कसं? हा प्रश्न निश्चितपणे उभा राहतो. त्यामुळे हा जो वाद आहे हा मराठी-हिंदी असा नसून हा वरचा जातवर्गीय प्रश्न आहे. त्यामुळे वरच्या जात वर्गीयांचा आरोपीला मिळणारा पाठिंबा हा आधी उठून दिसतो आहे. त्यामुळे आरोपीला ज्या पद्धतीने वागवलं जात आहे, ती पद्धतही यापूर्वी प्रशासनातून दिसलेली नाही. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर आहे. हा केवळ मराठी-हिंदीचा प्रश्न नाही तर हा एक प्रकारे माणूस आणि त्याची जगण्याची मूल्य याच्या विरोधात धनदांडग्यांनी उभी केलेली व्यवस्था चिरडून काढत आहे. हाच प्रश्न अधिक गंभीर आहे.

COMMENTS