मुंबई, दि. २४ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था

मुंबई, दि. २४ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ.वुईके म्हणाले, प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थांची विशेष पथकाद्वारे कार्यक्षमता व गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. प्रशिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून नवीन कोर्सेसचा समावेश करावा. तसेच पेसा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच व आदिवासी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत.
आदिवासी समाजाच्या लोककला, बोलीभाषा, संस्कृती व परंपरांचे दृकश्राव्य माध्यमातून संकलन करण्यात यावे. तसेच क्रांतिकारकांची चरित्रे बोलीभाषेत साहित्य स्वरूपात तयार करावीत. याचबरोबर धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत गावांचे आराखडे तयार करावे यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मंत्री डॉ.वुईके यांनी सांगितले.
COMMENTS