Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न :मुख्यमंत्री फडणवीस

पुणे/मुंबई, दि. १८: पुणे शहरात कोयता हातात घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारीच्या ९ घटना घडलेल्या आहेत. यामध्ये १९ आरोपींना अटक करण्

जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
आईचा मृतदेह पाहून मुलीने सोडला आपला प्राण.
मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

पुणे/मुंबई, दि. १८: पुणे शहरात कोयता हातात घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारीच्या ९ घटना घडलेल्या आहेत. यामध्ये १९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी १३ आरोपी विधी संघर्षित बालके आहेत. पुण्यात कुठल्याही प्रकारची कोयता गॅंग अस्तित्वात नसून अशा गुन्ह्यांमध्ये १५-१६ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. या विधी संघर्षित बालकांसाठी दिशा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पुणे शहरातील गुन्हेगारीबाबत सदस्य बापू पठारे यांनी प्रश्न उपस्थित केला होत. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे यांनी सहभाग घेतला.

७ नवीन पोलीस ठाणी सुरू करण्यास मान्यता

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विधी संघर्षित बालकांसाठी पुण्यात दिशा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांचे पुनर्वसन केले जाते. याप्रमाणे काही बालकांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. पुणे शहरातील पोलीस ठाण्याची हद्द विस्ताराने मोठी असल्याने अशा परिस्थितीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मर्यादा येत होत्या. ही बाब ओळखून शासनाने एकाच वेळी पुणे शहरात सात नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये बाणेर, फुरसुंगी, काळे पडळ, आळेफाटा, खराडी, वाघोली आणि नांदेड फाटा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीमुळे निश्चितच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे सोयीचे होणार आहे. विधी संघर्षित बालकांना सराईत गुन्हेगार गुन्हेगारी कृत्यांमध्ये उपयोगात आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये विधी संघर्षित बालकांचा असा उपयोग केल्यास सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा अधिकार आहे. विधी संघर्षित बालकाचा गुन्हा हा सराईत गुन्हेगारांनी केला असल्याचे मानण्यात येऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

अमली पदार्थांची विक्री, वाहतूक रोखण्यासाठी मोठी मोहीम

राज्यातील अमली पदार्थांची विक्री, वाहतूक रोखण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. हा एक विक्रम आहे. यामध्ये सहभागी असलेल्या नायजेरियन पॅडलरवर पण कारवाई करण्यात आलेली आहे. ‘ इंस्टाग्राम’ वरून थेट संदेश पाठवून अमली पदार्थांच्या ऑर्डर मागवण्यात येतात. अशा ऑर्डरची डिलिव्हरी करणाऱ्या कुरिअर कंपन्यांच्या कार्यालयांची पडताळणी करण्यात आली आहे. कुरियर कंपनीने अमली पदार्थांची ‘डिलिव्हरी’ दिल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना गुन्हेगार ठरविणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्री करणाऱ्या पान ठेल्यावर कारवाई करण्यात येत आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सीसीटीव्हीचे जाळे अधिक बळकट करण्यात येईल

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विदेशी नागरिकांना गुन्ह्याचा निकाल लागे पर्यंत ‘डिपोर्ट’ करता येत नाही. गुन्हे सिद्ध होऊन निकाल लागल्यानंतर त्यांना ‘डीपोर्ट’ करण्यात येईल. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून इलेक्ट्रिक गॅझेटच्या माध्यमातून गुन्हेगारांची ट्रॅकिंग करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून शक्य असल्यास ट्रॅकिंगही करण्यात येईल. गुन्ह्यांमधील 15-16 वर्ष वयोगटातील बालकांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे अधिक बळकट करण्यात येईल. तसेच दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी कुठल्या एजन्सीला देता येते का याबाबत पडताळणी करून निर्णय घेण्यात येईल.

COMMENTS