अहिल्यानगर : 'इज ऑफ लिव्हिंग' या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत १०० दिवस
अहिल्यानगर : ‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत १०० दिवसांमध्ये सर्व विभागांनी मिळून किमान ५ लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या ७ कलमी कार्यक्रमांची ‘मिशन १०० दिवस’उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमबजावणी करण्यात यावी. महसूल विभागामार्फत विद्यार्थी-विद्यार्थींनींना विविध प्रकारचे एक लाख दाखले देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे इतर शासकीय विभागांनीही त्यांच्या सेवा देण्याचे नियोजन करावे. प्रत्येक कार्यालय, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. कार्यालयातील दस्तऐवज सहागठ्ठे पद्धतीनूसार ठेवण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा. भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या विकासामध्ये विभागाचे योगदान असलेल्या ब्लॉगची निर्मिती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम तयार करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गतची कामे प्राधान्याने करत नागरिकांना विहित मुदतीमध्ये सेवा देण्यात याव्यात. डॅशबोर्डवर एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात विविध विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची माहिती अभिनव पहल या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS