Homeताज्या बातम्यासंपादकीय

ठाकरेंना स्वबळाचा फायदा होणार का?

महाविकास आघाडीत फूट ? यासंदर्भातील अग्रलेख आम्ही शनिवारच्या अंकातच लिहिल्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी या विषयावर लिहावे लागेल अशी सुतराम शक्यता न

लोकशाहीतील सोयीचे राजकारण
कर्नाटकातील जातीय समीकरण
चीनच्या कुरापती

महाविकास आघाडीत फूट ? यासंदर्भातील अग्रलेख आम्ही शनिवारच्या अंकातच लिहिल्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी या विषयावर लिहावे लागेल अशी सुतराम शक्यता नसतांना देखील उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थात सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली, त्यामागे अनेक कारणे आहेत, त्याचाच उहापोह करण्याचा हा प्रयत्न.
ठाकरे कुटुंबांचा इतिहास हा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू होतो. त्यांनी आपल्या लेखनीतून हिंदू धर्मावर घणाघाती टीका केली. तर त्यांचे सुपुत्र दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीची कास धरली. पक्षाच्या वाढीसाठी कोणतीतरी भूमिका घेवून पुढे जाणे गरजेचे होते, त्यामुळेच बाळासाहेबांना मराठी मुद्दा आणि कडव्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेवून मैदानात उतरले. त्यांना यश देखील मिळाले. मात्र स्वबळावर पुढे जाता येत नसल्यामुळे त्यांनी भाजपला सोबत घेतले. अर्थात बाळासाहेबांनी भाजपचा उल्लेख अनेकवेळेस कमळी म्हणत या पक्षाची खिल्ली देखील उडवली आहे. त्यानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे झाले. त्यांनी देखील पक्षावर चांगलीच कमान मिळवली. मात्र राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडल्याचा मुद्दा तीव्रतेने मांडला, आणि काँगे्रसविरोधक, कडव्या हिंदुत्ववाद्यांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपची साथ धरली. खरंतर काँगे्रसची विचारधारा भिन्न आहे, आणि त्यात शिवसेनेची भिन्न आहे. त्यामुळे ठाकरे यांनी आपली विचारधारा अधिक तीव्रतेने मांडण्याची गरज होती, ती मांडण्यात ठाकरे कमी पडले. तर एकनाथ शिंदे ही भूमिका मांडण्यात यशस्वी झाले. येथुनच ठाकरेंच्या शिवसेनेला उतरती कळा लागली. त्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल असा विश्‍वास होता, मात्र तो मिळवण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले, त्याचे प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर थेट टीका केली. नुसती टीकाच नाही तर ती अतिशय खालच्या स्तरावर जावून केली, त्यामुळे ठाकरे गटाचा जनाधार घटत गेला. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतून धडा घेत ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यात काही वेगळे झालेले नाही. तर दुसरीकडे महायुती एकत्र येवून निवडणुका लढणार आहे, त्याचे सुतोवाच शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. महायुती मुंबई महापालिकेसाठी मनसेला देखील सोबत घेवू शकते, तसे संकेत भाजपकडून दिले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर कडवे आव्हान असणार आहे. शिवाय पक्षाचा मेकओव्हर करणे, त्यासोबत ठाकरे यांनी आपल्या भाषणाची ट्यून बदलावी लागणार आहे. त्यात प्रामुख्याने भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर व्यक्तीगत टीका टिप्पणी करणे टाळावे लागणार आहे. तरच ठाकरे गट या निवडणुकीत चांगले यश मिळवू शकतो अन्यथा पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पानीपत होवू शकते. त्यासोबतच ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांना देखील ताकीद देण्याची गरज आहे. दररोज भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर टीका टिप्पणी करून तुमचा जनाधार वाढणार नाही. त्यासाठी विकासात्मक भूमिका घ्यावी लागणार आहे. खरंतर उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे दोघांतील कटूता कमी झाली असेल, यात शंका नाही. मात्र यातून ठाकरे गटाने धडा घेण्याची खरी गरज आहे. मुंबई, पुणे यासारख्या महापालिका सोडल्या तर ठाकरे गटाचा प्रभाव कमी होतांना दिसून येत आहे. त्यातच मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांची बैठक घेतली, या बैठकीत अनेक नाराज नगरसेवकांनी आपली भूमिका मांडतांना पक्षाकडून आपल्याला विश्‍वासात घेत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर कधीही न बोलणारे नगरसेवक बोलू लागले आहे, यातून ठाकरे गटात बंडखोरी अटळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही बंडखोरी टाळण्याचे आणि नव्या दमाच्या चेहर्‍यांना पुढे करण्याचे महत्वाचे धोरण शिवसेनेला राबवावे लागणार आहे. तरच ठाकरेंच्या शिवसेनेचा निभाव लागणार आहे.

COMMENTS