परभणी : परभणीत संविधान शिल्पाची तोडफोड केल्यानंतर आंबेडकरी समाजाकडून परभणी बंदची घोषणा देण्यात आली होती. यावेळी 11 डिसेंबर रोजी पुकारलेल्या बंदला
परभणी : परभणीत संविधान शिल्पाची तोडफोड केल्यानंतर आंबेडकरी समाजाकडून परभणी बंदची घोषणा देण्यात आली होती. यावेळी 11 डिसेंबर रोजी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. यात पोलिसांनी अनेकांची धरपकड केली होती, त्यात सोमनाथ सूर्यवंशी याला देखील ताब्यात घेण्यात आले होते. पोलिस कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी काँगे्रस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली ही हत्याच आहेत.
यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. मी मारहाण झालेल्या लोकांचीही भेट घेतली. त्यांनी मला शवविच्छेदन अहवाल दाखवला, व्हिडिओ व फोटो दाखवले. हा 99 टक्के नव्हे तर 100 टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना संदेश देण्यासाठी खोटे निवेदन केले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता व तो संविधानाचे संरक्षण करत होता म्हणून त्याला मारण्यात आले आहे, असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी न्यायाचीही मागणी केली. राहुल यांनी पीडित कुटुंबीयांशी अगदी जमिनीवर बसून संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी या प्रकरणाचे राजकारण होत असल्यासंबंधी प्रश्न केला. त्यावर राहुल गांधी संतापून म्हणाले, हे राजकारण नाही. या प्रकरणी कोणतेही राजकारण केले जात नाही. येथे हत्या झाली असून, न्याय झाला पाहिजे. योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयसेवक संघाची विचारधारा ही संविधान संपवण्याची आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मी या प्रकरणाच्या तपासावर समाधानी नाही. पीडितांना जबर मारहाण करण्यात आली आहे. हत्या करण्यात आली आहे. ही स्पष्टपणे हत्या आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्याही कुटुंबीयांची देखील भेट घेतली. वाकोडे यांचे हिंसाचारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे येथील हिंसाचार रोखण्यात मोठे योगदान होते.
परभणीची घटना सरकार पुरस्कृत : नाना पटोले
परभणी येथील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. परभणी येथील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत होती. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला. त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर त्यांचा मृत्यू दम्यामुळे झाल्याचे सांगून सभागृहाची दिशाभूल केली. त्यामुळे काँग्रेस परभणीसह बीडच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव दाखल केला जाईल, असे देखील पटोले यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
COMMENTS