राज्यातील मतदान संपल्यानंतर सुरू झालेल्या एक्झिट पोल मध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असताना, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये महायुती
राज्यातील मतदान संपल्यानंतर सुरू झालेल्या एक्झिट पोल मध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असताना, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये महायुतीच्या बाजूने एक्झिट पोल दिसताहेत; तरीही, प्रत्यक्षात मैदानात मात्र तशी स्थिती दिसून आलेली नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वच मतदारसंघांमध्ये पैसा वाटप झाला. याची कुणकुण अनेक लोकांमध्ये होती. परंतु, प्रत्यक्षात मतदान करताना लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा अपक्षांच्या बाजूने अधिक कौल दिला असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार जागोजागी च्या निरीक्षणात दिसले. हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलनी जे अंदाज व्यक्त केले होते; ते, प्रत्यक्षात उलट झाले. महाराष्ट्रात मात्र एक्झिट पोल महायुतीला सत्ता स्थानी दाखवत आहेत. परंतु, ही केवळ मानसिकता करण्याची तयारी आहे. अर्थात, निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीने प्रत्यक्षपणे विनोद तावडे यांचे प्रकरण होईपर्यंत, कुठेही पैशांच्या संदर्भात धाडी टाकता आलेल्या नाहीत. याचा अर्थ, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पैशांचा मुबलक वापर करू देण्यात निवडणूक आयोगाने मिटलेले डोळे, हे देखील एक कारण ठरले. परंतु, प्रत्यक्षात मतदारांनी आपल्या स्वतःच्या विवेकशीलतेशी विचार करत, या वेळी पैसा घेऊनही आपल्या इच्छित उमेदवारालाच मतदान करण्याचा चंग महाराष्ट्रातल्या मतदारांनी बांधल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. एकंदरीत, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जो कौल आहे, तो महाविकास आघाडीच्या बाजूने अधिक आहे. महायुती देखील स्पर्धेत आहेच. परंतु, महाविकास आघाडीपेक्षा महायुती किमान ५० जागांनी मागे राहील; असा प्रत्यक्षदर्शींनी अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात सरकार बदल अटळ आहे. मात्र, तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला २३ तारखेच्या रात्री मुख्यमंत्री जर जाहीर करता आला नाही, तर, उर्वरित दोन दिवस त्यांनी जर चर्चेच्या घडामोडीत वाया घालवले तर, निश्चितपणे २६ तारखेला राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. हा संभाव्य धोका महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कळतो आहे. त्यामुळे, कदाचित निवडणूक निकालांचा कल येण्यापूर्वीच त्यांच्यातील नेतृत्व हे ठरलेलं असेल. ही बाब केल्याशिवाय महाविकास आघाडीला सत्तेवर येता येणार नाही. मात्र, दुसरी एक बाब की, प्रत्येक राज्यात जेव्हा विरोधी पक्ष सत्तेवर येतो तेव्हा, प्रत्यक्षातील केंद्र सरकारची भूमिका त्या त्या राज्यातील राज्यपाल ठरवताना दिसतात. महाराष्ट्रात देखील २४ आणि २५ या दोन तारखांना राज्यपालांच्या भूमिकेला महत्त्व असणार आहे. जर, सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला पक्ष आघाडी म्हणून किंवा युती म्हणून बहुमतात नसला तरी, त्या बाबतीत राज्यपाल हे अंतिम निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी ही बाब ही महाराष्ट्राच्या सत्तेच्या घडामोडीत फार महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात दोनच दिवस राजकीय पक्षांच्या हातात आहेत. शिवाय, राज्यपालांची भूमिका या दोन बाबी सत्ता बदलाच्या आणि सत्ता स्थिर करण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या राहणार आहेत. महाराष्ट्राच्या मतदानाचा टक्का हा बऱ्यापैकी राहिला असला तरीही निवडणुकांचा निकाल २३ तारखेला जो होईल, त्यामध्ये, प्रत्यक्षदर्शींच्या किंवा सूत्रांच्या नुसार जो अंदाज बांधला जातो आहे, तो महाविकास आघाडीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कौल मिळाल्याचा अंदाज दिसतो आहे. परंतु, एक्झिट पोल मात्र महायुतीच्या बाजूने बोलता आहेत. याचा अर्थ हरियाणामध्ये ज्या बाजूने एक्झिट पोल उतरले ती बाजू पराभूत झाली. ज्या बाजूच्या विरोधात एक्झिट पोल होते, ती बाजू सत्तेत आली. महाराष्ट्रात एक्झिट पोलचेही असेच काही विरोधाभासी वातावरण राहील का हेही २३ तारखेला दुपारी स्पष्ट होईल.
COMMENTS