म्हसवड / वार्ताहर : दहिवडी पोलीस ठाण्याने सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स) प्रणालीत संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्
म्हसवड / वार्ताहर : दहिवडी पोलीस ठाण्याने सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स) प्रणालीत संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करून सर्वोत्कृष्ट सीसीटीएनएस पुरस्कार जिंकला आहे. या पुरस्कारासाठी ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस कर्मचार्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यावेळी पोलीस कर्मचार्यांचे कौतुक केले व भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सीसीटीएनएस प्रणालीच्या मदतीने गुन्हेगारी माहितीचा वेगाने मागोवा घेऊन परिणामकारक तपास करता येतो, यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले आहे.
महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गतही दहिवडी ठाण्याला गौरव
महिला सुरक्षेसाठी शासनाने राबवलेल्या महिला पथदर्शी प्रकल्पातही दहिवडी पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा पुरस्कार जिंकला. याबाबत सन्मानपत्र आणि पुरस्कारही पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महिला सुरक्षेच्या क्षेत्रात पोलीस ठाण्याने केलेल्या कार्याची सर्वत्र स्तुती होत आहे.
ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा दोन तासांत उलगडला
दहिवडी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी नुकत्याच दाखल झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यातही अवघ्या दोन तासांत आरोपीला पकडून 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कामगिरीबद्दलही ठाण्यातील कर्मचार्यांना प्रशंसापत्र आणि रोख बक्षीस देण्यात आले आहे. या कामगिरीमध्ये सपोनि अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार विजय खाडे, महिला पोलीस हवालदार नकुसाबाई कोळेकर, पोलीस नाईक स्वप्निल म्हामणे, महिला पोलीस नाईक नीलम रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदनशिवे यांचा मोलाचा सहभाग होता.
COMMENTS