तेहराण : इस्त्रायली सैन्याने इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत भयंकर युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणने इस्रायलच्या हल्ल्य
तेहराण : इस्त्रायली सैन्याने इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत भयंकर युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणने इस्रायलच्या हल्ल्याला तितकेच घातक उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
इस्रायलविरोधात लढणारी पॅलेस्टिनमधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्लाह या संघटनांना इराणचा उघड पाठिंबा आहे. त्यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये वितुष्ट आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने हिजबुल्लाहच्या महत्त्वाच्या नेत्यांना ठार केले होते. तेव्हापासून इराण संतापला आहे. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर एक क्षेपणास्त्र डागले होते. तेव्हाच इस्रायलने प्रत्युत्तराचा इशारा दिला होता. त्यानुसार 25 दिवसांनी इस्रायलने बदला घेतला. इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत जोरदार हल्ला चढवला. इस्त्रायली हल्ल्यानंतर इराणने प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली आहे.
अवघ्या तीन तासांत 20 इराणी लक्ष्यांवर हल्ले
इस्रायलने 3 तासांत 20 इराणी लक्ष्यांवर हल्ले केले. हा हल्ला शनिवारी पहाटे 2:15 वाजता सुरू झाला. 5 वाजेपर्यंत हल्ले सुरूच होते. यामध्ये क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या संरक्षण दलाने इराणवरील हल्ल्याची माहिती स्थानिक वेळेनुसार 2.30 वाजता दिली होती.
हवाई क्षेत्र बंद केले
अल्जझीराच्या वृत्तानुसार इस्रायल आणि इराकने आपली हवाई हद्द बंद केली आहे. इस्रायली अधिकार्यांनी सांगितले की, इस्रायलचे हवाई क्षेत्र भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत बंद राहील. त्याचवेळी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत हवाई क्षेत्र बंद राहणार असल्याची माहिती इराकी अधिकार्यांनी दिली आहे.
COMMENTS