Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच! प्रा. डॉ.सुभाष वाघमारे

सातारा : बहुश्रुत वाचन केल्यानेच माणूस ज्ञानी होत असतो. आपल्या प्रत्येक घरात जीवनाला विविध प्रकारचे ज्ञान देणारे ग्रंथ असायला हवेत. घर हे सदाचारी

बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे- आ. अमोल मिटकरी 
आ.राहुल पाटलांचे आवाहन, कार्यकर्त्यांनी धुडकावले
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरात वाचनालय गरजेचे ः स्नेहलता कोल्हे

सातारा : बहुश्रुत वाचन केल्यानेच माणूस ज्ञानी होत असतो. आपल्या प्रत्येक घरात जीवनाला विविध प्रकारचे ज्ञान देणारे ग्रंथ असायला हवेत. घर हे सदाचारी व ज्ञानसमृद्ध व्हायचे असेल तर वाचन संस्कृती घरात रुजवली पाहिजे. वाचन व्यासंगानेच जगात विविध क्षेत्रातील विविध विद्वान, संशोधक तयार झाले. त्यांच्या ज्ञानाने माणसाला यथार्थ जग समजू लागले. न्याय व अन्याय कळू लागला. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी इत्यादींनी देखील खूप वाचन करून देशासाठी योगदान दिले आहे. जगात आपल्या देशाचा दर्जा उंचावला आहे. वाचनाने व्यक्तिमत्व बहुश्रुत बनते, ग्रंथ वारसा असलेली सर्जनशील माणसे आपण तयार केली पाहिजेत. अनेकांना लिहिते, वाचते केले पाहिजे असे असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘अभिजात मराठी भाषा व वाचन संस्कृती’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे होते.
वाचन करण्याविषयी आवाहन करताना ते पुढे म्हणाले की, देह जगविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तसे मनाचे पोषण होण्यासाठी ग्रंथाची व अनुभवाची गरज असते. ग्रंथ आपल्याशी हितगुज करून सुख दुःख सांगत असतात. आपल्याला जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करीत असतात. व्याकूळ झालेल्या मनाला धीर देतात. तर दुःखी मनाला आधार देतात. ग्रंथ मित्र असतात तसे आपले सेवक असतात. ग्रंथ कधी आदेश देत असतात तर कधी सदुपदेश करीत असतात. ग्रंथ निष्ठावंत असतात. ते आपल्याला अनेक रस प्यायला देतात.आपल्या बालपणात, तारुण्यात, वृद्धापकाळात देखील आपले सोबती असतात. आपली प्रिय माणसे आपल्याला सोडून गेली तरीही ग्रंथ धीराने राहण्याची हिम्मत देतात आणि शांती आणि आनंदाच्या वाटा सांगत राहतात.आज मात्र ग्रंथ सोडून माणसे मोबाईलमध्ये अडकली आहेत. एकट्याने पुस्तक वाचून जग समजून घेण्याचा आनंद खूप मोठा असतो, म्हणून प्रत्येकाने नियमित दररोज एक तास तरी अवांतर वाचन केले पाहिजे. जगातील विविध माणसांची संस्कृती,अनुभव काय आहेत हे जाणून घेण्याची जिज्ञासा आता वाढलेली आहे. मराठीतील ग्रंथ इतर भाषेत अनुवादित होत आहेत त्यामुळे या पुढच्या काळात मराठीच्या वृद्धीबरोबर जगातल्या अनेकविध भाषा शिकल्या पाहिजेत. या कार्यक्रमात ग्रंथालय विभागाने ‘चांगले वाचक’ म्हणून मराठीचे प्राध्यापक प्रा.घनश्याम गिरी यांची निवड केली. व त्यांचा या कार्यक्रमात ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल प्रा.विकास बर्गे यांनी केले. तर आभार प्रा. सुवर्णा मूळगावकर यांनी मानले या कार्यक्रमास प्रा.डॉ.संभाजी गावडे, प्रा. डॉ. अनिल उबाळे, प्रा. डॉ. वंदना मोहिते, प्रा.आर.एस.जाधव, प्रा.प्राजक्ता पाटणे, प्रा.धनाजी सावंत, प्रा. कुलकर्णी, श्रीमती नीता मोहिते, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.

COMMENTS