Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिवनेरीतील सुंदरीचा घाट कशासाठी ?

एसटी बसचं रूपडं बदलणे सोडून विमानामध्ये असणार्‍या एअर होस्टेसच्या धर्तीवर शिवनेरी बसमध्ये सुंदरी नेमण्याचा निर्णय एसटीचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गो

मणिपूर हिंसाचारापुढे सरकारची हतबलता !
जनतेच्या प्रश्‍नांचे काय ?
समान नागरी कायद्याच्या दिशेने !

एसटी बसचं रूपडं बदलणे सोडून विमानामध्ये असणार्‍या एअर होस्टेसच्या धर्तीवर शिवनेरी बसमध्ये सुंदरी नेमण्याचा निर्णय एसटीचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावले यांनी घेतला आहे. गोगावले यांनी हा निर्णय घेण्यामागचे त्यांचे तारतम्य काय? याचे उत्तर त्यांनी देण्याची खरी गरज आहे. शिवनेरी आणि विमानांची बरोबरी होणार आहे का? विमानतळावर आणि विमानात मिळणार्‍या सोयी-सुविधा बसमध्ये मिळणार आहेत का? याचे उत्तर नकारात्मक असेल तर गोगावले यांचा सुंदरी नियुक्तीचा घाट कशासाठी?
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची नुकतीच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. खरंतर गोगावले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची आस होती, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणे शक्य नसल्यामुळे आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असतांना गोगावले यांनी एसटी महामंडळाचा कारभार सुधारण्यासाठी नाविण्यपूर्ण उपाययोजना आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी भरीव असे निर्णय घेणे अपेक्षित असतांना त्यांनी एअर होस्टेसच्या धर्तीवर एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर हा निर्णय कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला पटणारा नाही. एसटीच्या सुविधांविषयी न बोललेच बरे. कारण बसेस इतक्या जुन्या झाल्या आहेत, त्यातून होणारे प्रदूषण चिंताजनक आहे. एखाद्या बसेसच्या मागे जर दुचाकीस्वार जात असेल तर त्याची अवस्था असह्य होते. शिवाय एसटीच्या बसमध्ये बसणार्‍या प्रवाशांची काय मानसिकता आहे, याविषयी जाणून घेणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे नवनियुक्त अध्यक्षांनी टाळले असले तरी सुंदरीचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या संचालक मंडळाची मंगळवारी 304 वी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्यांच्या 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मुंबई- पुणे मार्गावर धावणार्‍या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येईल अशी माहिती गोेगावले यांनी यावेळी दिली. खरंतर एसटी बसमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना आदरतिथ्याची गरज नाही, तर त्यांना योग्य त्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत हीच प्रमुख अट आहे. शिवाय या सुंदरीला बसमधील काही विकृत प्रवाशांनी त्रास दिल्यास तर पुन्हा एकदा एसटीचा आणि प्रवाशांचा वेळ जाणार यात शंकाच नाही. खरंतर एकवेळ रेल्वेत ही संकल्पना समजू शकतो. कारण रेल्वेमध्ये अनेक डब्बे असतात, प्रवाशी संख्या मोठी असते, अशावेळी रेल्वेत अशा नाविण्यपूर्ण संकल्पनेचे स्वागत करता येईल, मात्र शिवनेरी बसमध्ये सुंदरी नेमण्याची कल्पना अवघड आहे. त्यामुळे गोगावले यांनी निर्णय घेण्याआधी विचार करण्याची खरी गरज आहे. महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य असतांना या राज्यात नेमके कोणते निर्णय घेतले पाहिजे, या बसमध्ये कोणते प्रवासी प्रवास करतात, याची खातरजमा करूनच निर्णय घेण्याची खरी गरज आहे. खरंतर एअर होस्टेसच्या धर्तीवर जरी हा निर्णय घेण्याचा घाट घातला जात असला तरी विमानसेवा आणि एसटी बससेवा यांच्यात मोठी तफावत आहे. एसटी महामंडळाचे रूपडे बदलण्यासाठी कोणत्याही कठोर उपाययोजना अद्याप राबवण्यात आलेल्या नाहीत. एसटीकडे नवीन बसेसची वानवा आहे. एसटी ही ग्रामीण जीवानाची वाहिनी आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील मनुष्य हा एसटीने प्रवास करतो. अशा परिस्थितीत त्यांना अजूनही पुरेशा अशा सुविधा मिळत नाही. तरी ते मुकाट्याने प्रवास करणार आहेत. असे असतांना शिवनेरीमध्ये सुंदरी कशासाठी नेमणार? याचे उत्तर गोगावले यांनीच देण्याची खरी गरज आहे.

COMMENTS