Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. हाके यांच्यावर झुंडशाहीचा हल्ला गंभीर!

 ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांना मराठा तरुणांनी ज्या पद्धतीने घेरले, ते झुंडशाहीपेक्षा कमी नाही. राज्यामध्ये कायदा आणि स

आता कर्नाटकचेही शैक्षणिक धोरण !
सभा दणाणल्या, माणूस हरवला!
मुख्यमंत्री पदाची डेट लाईन २ महिनेच ?

 ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांना मराठा तरुणांनी ज्या पद्धतीने घेरले, ते झुंडशाहीपेक्षा कमी नाही. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची बाब कोलमडवून मराठा तरुण ज्या पद्धतीने प्रा. लक्ष्मण हाके यांना घेरत आहेत, धक्काबुक्की करत आहेत, त्यातून त्यांचा तोल जाताना दिसतो आहे. परंतु, एखादा आंदोलक आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी खाजगी वेळात गेला असताना, त्या घरी जाण्याची आंदोलकांना नेमकी गरज काय होती? याचा अर्थ अशी झुंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तयार केली आहे काय? आणि त्या झुंडीला ओबीसी नेत्यांच्या मागे लावून, त्यांच्यावर पाळत ठेवण्याचं काम केलं जात आहे काय? ही बाब व्यक्तीच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करणारी आणि व्यक्तीचं आहार, विचार, आणि विहार स्वातंत्र्य नाकारणारी आहे. झुंडशाही महाराष्ट्राला नवीन नाही. अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीची निदर्शक राहिलेली आंदोलनेही झाली आहेत.  परंतु, प्रा. लक्ष्मण हाके यांना घेरणारी जी झुंडशाही मराठा युवकांनी केली आहे, ती मॉब लिंचिंग सदृश्य असणारी आहे.  म्हणूनच प्रा. लक्ष्मण हाके यांनी केलेला आरोप मला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला गेला; हा अतिशय समर्पक आरोप आहे. अर्थात, प्रा. लक्ष्मण हाके यांनी जर मद्यप्राशन केले असते तर, अवघ्या एक तासात पोलीस चौकीतून बाहेर येऊन, ते पत्रकारांशी संवाद साधू शकले नसते! ही बाब ठळकपणे आपल्याला जाणवते. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ओबीसी आणि मराठा हा संघर्ष तीव्र करण्याचे सत्ताधाऱ्यांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ओबीसी हा संख्येने बलाढ्य आहे; पण, स्वभावाने शांत आहे. याचा गैरफायदा सत्ताधाऱ्यांनी उचलू नये. अन्यथा, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची पात्रता सिद्ध करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य ओबीसी समुदाय पार पाडल्याशिवाय राहणार नाही! प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाशी आमचे मतभेद राहिले आहेत. आम्ही रोहिणी आयोगाच्या समर्थनाच्या अनुषंगाने यापूर्वी लेखही लिहिला आहे. परंतु, ओबीसी आणि मराठा हा भेद उभा करून ज्या पद्धतीने ओबीसींना धमकावण्याचा, डावलण्याचा आणि झुंडशहीने त्यांची गळचेपी करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला जात आहे, तो ओबीसी कदापिही सहन करून घेणार नाही. महाराष्ट्राच्या निवडणुक राजकारणासाठी महायुतीतील तिन्ही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या सत्ताधारी मंत्र्यांनीही हा विषय गांभीर्याने हाताळावा! अन्यथा, एका बाजूला तुम्ही मराठा तरुणांना झुंडशाहीसाठी उकसवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या न्याय्य प्रश्न घेऊन लढणाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत; ही बाब माॅबलिंचिंग सारख्या परिस्थितीकडे घेऊन जाणारी आहे, असं आमचं ठाम मत आहे. महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा असून, समतेचा संत प्रवाहही या महाराष्ट्राचा कणा आहे. अशा या महाराष्ट्रामध्ये झुंडशाही जेव्हा आकार घेत आहे, तेव्हा, त्याचा कडाडून विरोध केल्याशिवाय ओबीसी स्वस्थ बसणार नाही. कारण, ओबीसी हा निश्चित शांतताप्रिय, व्यवसायभिमुख आणि कुठल्याही पातळीवर हिंसेचा समर्थन करणारा नाही. प्रा. लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात जी घटना पुण्यातील कोंढवा येथे घडली, ती अतिशय गंभीर आहे. कोंढवा, गेल्या काही दिवसांपासून अतिशय गंभीर गुन्ह्यांसाठी ओळखलं जात आहे. त्या कोंडव्यामध्येच प्रा. लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा तरुणांनी केलेली धक्काबुक्की ही कदापिही सहन केले जाणार नाही. याची या राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील तातडीने दखल घ्यावी. कारण, हा प्रश्न व्यक्तीचा नसून संपूर्ण ओबीसी समाजाच्या स्वाभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा देखील आहे.

COMMENTS