राहुरी ः राज्यातील महायुतीच्या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या बहिण माझी लाडकी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या समितीत अज

राहुरी ः राज्यातील महायुतीच्या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या बहिण माझी लाडकी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या समितीत अजित पवार गटाच्या समर्थकांना डावलून बहुतांश ठिकाणी अध्यक्ष म्हणून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने अजित पवार गटाच्या समर्थकांची पुन्हा एकदा गोची झाली आहे.
राज्य शासनाने बहीण माझी लाडकी योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये महिलांना देण्याची योजनेसाठी अर्ज मागवले होते. नगर जिल्ह्यातून साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले, राहुरी तालुक्यातूनही प्राप्त झालेल्या अर्जापैकी केवळ 70 अर्ज बाद झाल्याची माहिती समजली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकार्यांच्या अधिकारात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. नियुक्त समितीच्या अध्यक्षपदी अशासकीय सदस्यांची निवड अपेक्षित आहे. बहुतांश ठिकाणी भाजपने आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत. परिणामी अजित पवार गटाला जणू हिनावल्याचेच दिसून येते. एवढेच नव्हे जेथे महाविकास आघाडीचे आमदार आहेत, त्या ठिकाणीही विद्यमान आमदारांना डावलून तेथेही भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांना नियुक्त केले आहे. तालुकास्तरीय समितीत अशासकीय व्यक्ती अध्यक्ष अन्य दोन अशासकीय व्यक्ती सदस्य तर उर्वरित सात शासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. बहीण माझी लाडकी योजनेचे 17 ऑगस्ट पर्यंत अर्ज प्राप्त लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे जाहीर केले जात असताना योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत समितीवर भाजपचाच वर चष्मा असल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गटामध्ये अस्वस्थता पसरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
COMMENTS