श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपूर्वीच कठुआ येथे झालेल्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे लष
श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपूर्वीच कठुआ येथे झालेल्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. यामध्ये एका कॅप्टनचा आणि एका पोलिसाचा देखील समावेश आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस सोमवारपासून येथे शोध मोहीम राबवत होते. शोध सुरू असताना सोमवारी रात्री दहशतवादी गोळीबार करत पळून गेले. सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. घनदाट जंगलामुळे दहशतवादी सुरक्षा दलांना चकमा देत राहिले. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला. यामध्ये पाच जवान गंभीर जखमी झाले. यातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू विभागातील डोडा येथे 34 दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. यापूर्वी 9 जुलै रोजी चकमक झाली होती. यात पाच जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते. लष्कर व सुरक्षा दलाने खोर्यात लपलेल्या दहशतवाद्यांना शोध घेण्यासाठी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. यात पाच जवान हे गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला. काश्मीर टायगर्स ही संघटना पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एक छोटा गट आहे. याच दहशतवादी संघटनेने 9 जुलै रोजी कठुआ येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. अधिकार्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि डोडा येथील स्पेशल ऑपरेशन ग्रुपने सोमवारी संध्याकाळी 9 वाजल्यानंतर डोडा जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती होती. त्यानुसार लष्कराचे पथक, जम्मू काश्मीर पोलिस व इतर सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. यानंतर जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तब्बल 20 मिनिटे चाललेल्या या चकमकीत एका अधिकार्यासह चार जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता चारही जवानांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डोडामध्ये अजूनही दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. येथे तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल सतर्क आहेत. 14 जुलै रोजी कुपवाडा येथे नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणार्या दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले होते.
COMMENTS