Homeताज्या बातम्यासंपादकीय

ट्रम्प यांच्या हत्येमागचे षडयंत्र

अमेरिका हा लोकशाहीप्रधान देश असून, हिंसेचे समर्थन जरी हा देश करत नसला, तरी याच देशातील एका माजी राष्ट्राध्यक्षांवर करण्यात आलेला गोळीबार अमेरिकेच

जागतिक पटलावर भारत केंद्रस्थानी
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ
मानवी चूका आणि पूरस्थिती

अमेरिका हा लोकशाहीप्रधान देश असून, हिंसेचे समर्थन जरी हा देश करत नसला, तरी याच देशातील एका माजी राष्ट्राध्यक्षांवर करण्यात आलेला गोळीबार अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दाखवणारा आहे. शिवाय अमेरिकेने ही बाब गांभीर्याने घेत, यापाठीमागचे सूत्र, हत्या करण्याचे नियोजन, मुख्य सूत्रधार कोण, या सर्व बाबींचा उहापोह करण्याची गरज आहे.
अमेरिकेसारख्या देशांची गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस आणि सुरक्षा दल अतिशय सक्षम असल्याचे दिसून येते. असे असतांना देखील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अर्थात ही सुरक्षेतील सर्वात मोठी चूक असल्याचे देखील समोर आले आहे. नशीब बलवत्तर म्हणून ट्रम्प थोडक्यात बचावले, तरीही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. यावेळी एका नागरिकाचा मृत्यू देखील झाला आहे. वास्तविक पाहता अमेरिकेसारख्या लोकशाहीप्रधान सध्या निवडणुकीचे वारे वाहतांना दिसून येत आहे. असे असतांना रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढती आहेत. खरंतर ट्रम्प यांना पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन देखील निवडणुकीत प्रतिस्पर्धी आहेत. खरंतर ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. शिवाय त्यांनी बरीच माहिती लपवल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत अमेरिकेची जनता स्वीकारेल का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. शिवाय ज्या 20 वर्षीय व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला, तो देखील त्यांच्याच पक्षाचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल यात शंका नाही.

मात्र गोळीबार झाल्यामुळे ट्रम्प यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. खरंतर जगातील बलाढ्य देश म्हणून अमेरिकीची ओळख आहे. अशावेळी अमेरिकेचा कारभार सुरक्षित व्यक्तीच्या असण्याची गरज आहे. एकतर ट्रम्प यांची वादग्रस्त कारकीर्द, त्यानंतर बायडेन यांनी आपल्या कारकीर्दीत म्हणावा तसा प्रभाव पाडलेला नाही. असे असतांना पुन्हा एकदा दोघेही प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकतांना दिसून येत आहे. ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी पक्षाने अजून जाहीर केली नसली तरी, ट्रम्प ज्याअर्थी सभा घेत आहे, त्याअर्थी त्यांची उमेदवारी पक्की दिसून येत आहे. त्याचबरोबर गोळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा ट्रम्प यांना सहानुभूती मिळू शकते, आणि याच जोरावर ते निवडणूक जिंकू शकतात. गोळी कानाला चाटून गेल्यानंतर ही त्यांनी हाताची मूठ आवळत, फाईट शब्दाचा नारा दिला. त्यामुळे जनतेला ते हेच सूचित करू इच्छित होते की, माझ्यावर कितीही हल्ले झाले तरी, आपण मागे हटणार नाही. शिवाय रिपब्लिकन पक्षाला आपला उमेदवार निवडून येण्यासाठी एकप्रकारे लोकप्रिय उमेदवार हवा होता. ट्रम्प यांची कारकीर्द जरी वादग्रस्त असली, तरी त्यांची निर्णय घेण्याची मोठी होती. परिणामाची चिंता न करता, त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. याउलट बायडेन यांची भूमिका गळचेपी होती, वेळकाढूपणाची होती. त्यामुळे त्यांचे अनेक निर्णयांना उशीर झाल्याचे दिसून येत होते. ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयने पत्रकार परिषद घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. एफबीआय फील्ड ऑफिसर केविन रोजेक यांनी या हल्ल्याला ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न मानले जात असल्याचे सांगितले. वास्तविक पाहता ही झाली माहिती. मात्र ट्रम्प यांची हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात येत होती, ट्रम्प यांची हत्या करण्यामागचा हेतू नेमका काय होतो, या सर्व बाबींचा उहापोह होण्याची गरज आहे. ट्रम्प यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली होती का, हल्लेखोर जवळच्या बिल्डिंगमध्ये काही मीटरच्या अंतरावर असतांना सुरक्षा दलाच्या जवानांना तो कसा दिसला नाही, त्यांने त्या स्थळापर्यंत रायफल कशी नेली, या सर्व बाबींची चौकशी झाल्यास अनेक गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

COMMENTS