Homeताज्या बातम्यासंपादकीय

प्रदूषणाचा विळखा

नुकतेच लॅन्सेट प्लॅनेट हेल्थचा अहवाल समोर आला असून, या अहवालामध्ये भारतातील 10 शहरांना वायू प्रदूषणाचा घट्ट विळखा बसला असून, यामुळे जवळपास 33 हजा

ट्रम्प यांच्या हत्येमागचे षडयंत्र
केरळमध्ये आभाळ फाटलं
निवडणुकीचे गाजर आणि घोषणांचा पाऊस

नुकतेच लॅन्सेट प्लॅनेट हेल्थचा अहवाल समोर आला असून, या अहवालामध्ये भारतातील 10 शहरांना वायू प्रदूषणाचा घट्ट विळखा बसला असून, यामुळे जवळपास 33 हजार लोकांचा मृत्यू प्रदूषणाने होत असल्याचे धक्कादायक वास्तव यात मांडले आहे. खरंतर या अहवालातील आकडेवारी तंतोतर खरी की, यात अवास्तव हा संशोधनाचा विषय असला तरी, वाढते प्रदूषण चिंताजनक परिस्थितीवर पोहोचल्याचे नाकारून चालणार नाही. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. तर राजधानी दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, शिमला आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. वास्तविक पाहता राजधानी दिल्लीची प्रदूषणामुळे काय अवस्था होते, आणि तिथले नागरिक जीवन कसे जगतात, यासदंर्भातील परिस्थिती भयावह असल्याचे चित्र अनेकवेळेस आपण पाहिले आहे. खरंतर प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला असतांना देखील त्यावर उपाययोजना करण्यात आपण कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाहीत. या गोष्टींकडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्या भावी पिढयांना याचा खूप त्रास होऊ शकतो. प्रदूषण ही आजच्या काळातील एक खूप गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे.

वाढते प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल, पेट्रोल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात. वाढत्या वायू प्रदूषणामुळे खोकला, घसादुखी, श्‍वसनासंबंधित आजार, डोळ्यात जळजळ, शरीरात थकवा जाणवणं यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. वाढतं वायू प्रदूषण ही धोक्याची घंटा आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याबाबत एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, जगात अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे हवा स्वच्छ आणि शुद्ध आहे. दिवसेंदिवस हवा अधिकाधिक विषारी होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. जगातील केवळ 0.0001 टक्के लोकसंख्या कमी प्रदूषित हवेत जगत आहे. वर्षभरातील 70 टक्के दिवसात हवा प्रदूषित राहते. प्रदूषणात सर्वात मोठा सहभाग हा विकसित देशांचा असल्याचे दिसून येत आहे. कारण सध्या प्रगत देशांत अनेक वस्तू काही काळ वापरल्यानंतर फेकून देण्यात येतात. त्यांत मुख्यत्वेकरून प्लॅस्टिकची भांडी, पिशव्या, आवरणे, वेष्टने, बाटल्या, टिनचे (कथिलाच्छादित पत्र्याचे) डबे, काचेची तावदाने, व इतर वस्तू आणि कागद यांचा समावेश असतो. थोडेसे नादुरुस्त असलेले दूरचित्रवाणी संच व मोटारगाड्याही फेकून देण्यात येतात. त्यामुळे प्रदूषण वाढीतही या देशांचा मोठा सहभाग दिसून येतो. अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटीच्या जवळपास असतांना हा देश सर्वाधिक उत्सर्जन करतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे विकासाची संकल्पना बदलण्याची गरज आहे. कारण विकास हा शाश्‍वत असायला हवा, तरच प्रदूषणाचा विळखा काही प्रमाणात सैल करण्यात मदत मिळेल. अन्यथा वाढती लोकसंख्या यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होवू शकते. 

COMMENTS