Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभरात ओबीसी समाज आक्रमक

आंदोलनाची धग वाढली; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

जालना ः राज्यात ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवारी या उपोषणाचा सातवा दिवस

विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी सर्व विभागांनी खबरदारी घ्यावी ः उपसभापती डॉ. गोर्‍हे
सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यास दीड कोटींचा गंडा
व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीपतर्फे परिचर्या

जालना ः राज्यात ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बुधवारी या उपोषणाचा सातवा दिवस असून, प्रा. हाके यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राज्यभर ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ओबीसी बांधवांनी बुधवारी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला आहे. जालना जिल्ह्यातील जामखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर बीडमध्ये देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची हमी सरकारने द्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी ओबीसी समाजाचे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान दोन्हीही आंदोलकांची तब्बेत खालावली आहे. या आंदोलकांची तपासणी डॉक्टरांच्या पथकाने केली आहे. यामध्ये लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला असल्याचे समोर आले आहे. तर हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानेही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, प्रा. लक्ष्मण हाके हे आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका असल्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे. प्रा. लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीडमधील केज येथून 200 वाहनांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झाला आहे. लक्ष्मण हाके हे गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ बीडमधून मोठ्या संख्येने लोक बाहेर पडले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात रास्ता रोकोही करण्यात आला होता.

ओबीसी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या – ओबीसी आंदोलकांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, या आरक्षणावर कोणतीही गदा येणार नाही, याचे लेखी आश्‍वासन राज्य सरकारने द्यावे अशी प्रमुख मागणी केली आहे. शिवाय आंदोलक या प्रमुख मागण्यांवर ठाम आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. या माध्यमातून ओबीसी समाजाच्या आरक्षणात खुसखोरी होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यात आता सगेसोयरेची अंमलबजावणी करण्याची तयारी राज्य सरकारकडून केली जात आहे. त्यामुळे याचा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम कसा होणार नाही. हे आम्हाला सांगावे? असा सवालही आंदोलनकर्त्यांनी सरकारला केला आहे.

COMMENTS