मुंबई ः लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने सर्वाधिक जागा मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे काँगे्रसने सांगलीत मदत न करता आपला अपक्ष उमेदवार
मुंबई ः लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने सर्वाधिक जागा मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे काँगे्रसने सांगलीत मदत न करता आपला अपक्ष उमेदवार उभा केल्याने ठाकरे गट नाराज आहे. यातच विधानपरिषदेच्या जागांवरून काँगे्रस आणि उद्धव ठाकरे यांच्यात नव्या वादाला तोंड फुटतांना दिसून येत आहे. त्याला निमित्त ठरले विधानपरिषद निवडणूक. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी काँगे्रसला न सांगताच आपले चारही उमेदवार जाहीर केल्यामुळे काँगे्रसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाकडून चार जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच जाहीर नाराजी बोलून दाखवली. अजूनही वेळ गेली नाही, असे सांगतानाच शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराही दिल्याचे मानले जात आहे. उद्धव ठाकरेंनी आधी दोन जागा जाहीर केल्या होत्या. मात्र आमची कोकण आणि नाशिकमध्ये तयारी आहे असे मी त्यांना सांगितले होते. त्यावर बसून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईत आम्ही अजून अर्ज केलेला नाही, त्यामुळे अजूनही वेळ गेली नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. मी स्वतः मातोश्रीवर सकाळपासून फोन लावला होता. पण अजून संपर्क झालेला नाही. आमचे खासदार भेटायला जातात त्यात गैर नाही. जागावाटप हा वेगळा मुद्दा आहे. आमची भूमिका जुळवून घ्यायची आहे. आम्ही अजूनही एकजुटीने लढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नाना पटोले यांनी विधानपरिषदेचे उमेदवार मागे घ्या, असा निरोपच ठाकरे गटाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन देखील केला, परंतु ठाकरेंनी त्यांचा फोन न उचलल्याने अद्याप निरोप मिळालेला नसल्याचे ते म्हणाले. नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती अशी काँग्रेसची भूमिका आहे. मुंबईतून विधानपरिषदेसाठी अर्ज भरलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ठाकरेंनी कायम ठेवावेत. मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरेंनी मागे घ्यावेत, असा निरोप नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. चारही ठिकाणी चर्चा न करता उमेदवार दिल्याने काँग्रेसमधे नाराजी आहे. ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त आहेत.
नाना पटोलेंचा फोन घेणे ठाकरेंनी टाळले? – विधानपरिषदेच्या जागावाटपावरून काँगे्रस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. ठाकरे यांना सांगितले की, दोन जागा तुम्ही लढा दोन जागा मी लढतो. त्यावेळी ते म्हणाले तुमचे उमेदवार कोण आहेत? मग मी उमेदवारांची नावे सांगितली. मूळ प्रश्न आहे की, चर्चा करुन जागावाटप केले असते तर या चारही जागा निवडून येणे सोपे झाले असते. मी सकाळपासून त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचे ऑपरेटर आमच्या ऑपरेटरला साहेब तयार होत आहेत, असाच निरोप देत आहेत. माझ्याशी काय उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमके त्यांच्या मनात काय आहे हेच कळत नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
COMMENTS