नवी दिल्ली ः उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे बोगद्यात तब्बल 10 दिवसांपासून 41 कामगार अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मोठी बचाव मोहीम सुर
नवी दिल्ली ः उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे बोगद्यात तब्बल 10 दिवसांपासून 41 कामगार अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मोठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून, मंगळवारी बचाव पथकाला यश मिळतांना दिसून येत आहे. कारण या 41 कामगारांचा व्हिडिओ प्रथमच समोर आला असून, सर्व कामगार सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत कॅमेरा पोहचल्यामुळे बचावकार्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय रेस्क्यू टीमने बोगद्यात 6 इंची पाईप टाकण्याचे काम वेगाने सुरू केले आहेत. या पाईपने आतापर्यंत 57 मीटरचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती आहे.
कामगारांना हरभरा, मखणा आदी गरम जेवण पाठवण्यात आले. तर 10 दिवसांनंतर कामगारांना खिचडी पाठवण्यात आली. खिचडी बाटल्यांमध्ये भरून पाईपद्वारे त्यांच्याकडे पाठवली जात होती. त्यांच्यासाठी मंगळवारी सकाळी देखील गरमागरम नाश्ता पाठवण्यात आला. कामगारांना मोबाईल फोन, चार्जर यांसारख्या उपयुक्त वस्तूंचाही पुरवठा करण्यात आला आहे. पाईपच्या मदतीने मजुरांपर्यंत अन्न म्हणजे ब्रेड, भाजीपाला आणि वैद्यकीय वस्तू पाठवल्या जाणार आहे. याआधी बोगद्यात अडकलेले मजूर फक्त मुरमुरे, उकडलेले व भाजलेले हरभरे आणि सुका मेवा खात होते. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे. सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी 5 दिवस ते एक आठवड्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. जसजसा बचाव कार्याला वेळ लागत आहे, तसतशी बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत आहेत. अनेक मजुरांचे कुटुंबीय सिल्क्यरा येथे पोहोचले आहेत. प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.
कामगारांच्या सुटकेसाठी पाच योजना – बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यासाठी 5 योजना आखण्यात आल्या आहेत. सध्या एजन्सी दोन योजनांवर काम करत आहेत. पहिले अमेरिकन ऑगर मशीन बोगद्याच्या ढिगार्यात 800-900 मिमी स्टील पाईप टाकण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून या पाईपच्या मदतीने कामगारांना बाहेर काढता येईल. ऑगर मशिनच्या सहाय्याने 24 मीटर खोदकामही करण्यात आले आहे. मात्र, मशीनमध्ये बिघाड झाला. यानंतर काम थांबले. पुन्हा औगर मशिनद्वारे ड्रिलिंग सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उभ्या ड्रिलची योजना देखील आहे. त्यासाठी मशीन बोगद्याच्या वर पोहोचली आहे. हे यंत्र खोदकाम सुरू करणार आहे. तो बोगद्याच्या वरच्या बाजूने खोदला जाईल, जेणेकरून कामगारांना थेट वरून बाहेर काढता येईल.
COMMENTS